पुण्यातील वसतिगृहाचा वाद; ट्रस्टचे स्पष्टीकरण, ‘जागा विकली, पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी’
पुणे: पुण्यातील मॉडल कॉलनी येथे असलेल्या सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या वसतिगृहाबाबत सुरू असलेल्या वादावर ट्रस्टने आणि संबंधित व्यक्तींनी स्पष्टीकरण दिले आहे. ट्रस्टने वसतिगृहाची जागा खासगी विकासकाला विकल्याच्या आरोपांना उत्तर देताना, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
चकोर गांधी यांनी दिले स्पष्टीकरण:
जैन समाजाचे कार्यकर्ते चकोर गांधी यांनी या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की, “1962-63 मध्ये जैन विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह बांधण्यात आले होते. गेल्या 60 वर्षांपासून एकाच कुटुंबाने ट्रस्टचे अध्यक्षपद सांभाळले आहे. या वसतिगृहामुळे अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली असून, ते आज यशस्वी झाले आहेत. मात्र, ही जागा समाजाची नसून पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची आहे आणि ती कोणत्याही देणगीतून मिळालेली नाही.”
इमारतीची बिकट अवस्था:
गांधी यांनी वसतिगृहाची इमारत 62-65 वर्षे जुनी असून तिची अवस्था बिकट असल्याचे सांगितले. त्यामुळेच ट्रस्टने पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. या पुनर्विकासात जुने मंदिर तसेच ठेवून नवीन, जागतिक दर्जाचे वसतिगृह बांधले जाणार आहे. ट्रस्टकडे येणाऱ्या पैशांचा वापर पुणे आणि उपनगरात आणखी दोन-तीन वसतिगृहे उभारण्यासाठी केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सोशल मीडियावरील अफवा:
वसतिगृहाचे अधीक्षक सुरेंद्र गांधी यांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवरून नाराजी व्यक्त केली. “ट्रस्टने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट अनेक वेळा स्पष्ट करण्यात आली आहे, तरीही काही स्वार्थी मंडळी संस्थेची बदनामी करत आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी जनतेला अशा खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
ट्रस्टची बाजू:
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने अधिकृत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ट्रस्टची स्थापना 1958 मध्ये झाली. ट्रस्टने ही मालमत्ता खरेदी केली होती आणि ती दान मिळालेली नाही. इमारतीची दयनीय अवस्था लक्षात घेता, ट्रस्टने ती विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, चॅरिटी कमिशनरांकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर गोखले लँडमार्कस् एल. एल. पी. ने सर्वाधिक बोली लावली आणि 4 एप्रिल 2025 रोजी परवानगी मिळाल्यानंतर मालमत्ता हस्तांतरित करण्यात आली. जुने जैन मंदिर जागेवरच कायम ठेवले जाणार असून, वसतिगृह आणि मंदिरासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणार आहे, असेही ट्रस्टने स्पष्ट केले.
