Wednesday, June 3, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

चित्रांमध्ये भडक रंग वापरायला धाडस असावे लागते – चारुहास पंडित

पुणे : चित्रांमध्ये भडक रंग वापरल्यास अनेकदा ते रंग अंगावर येतात, त्यामुळे चित्रांसाठी कलाकाराला रंगांची निवड व्यवस्थितपणे हाताळता यायला हवी. म्हणूनच चित्रांमध्ये भडक रंग वापरायला धाडस असावे लागते असे मत चिंटूकर्ते म्हणून आपल्या सर्वांच्याच ओळखीचे असलेले प्रसिद्ध कार्टुनिस्ट चारुहास पंडित यांनी मांडले. पुण्यातील चित्रकार दीपक वैद्य यांच्या अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांच्या ‘मेडले ऑफ डिफरंट स्ट्रोक्स’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंडित बोलत होते. प्रसिद्ध कलाशिक्षक, कलाकार असलेले प्रो. डॉ. सुभाष पवार, मा. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, दीपक वैद्य, संगीता वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दीपक वैद्य यांच्या अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांचे हे चित्रप्रदर्शन उद्या रविवार दि. १४ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले असून घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत रसिकांना ते अनुभविता येईल. प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

याप्रसंगी बोलताना चारुहास पंडित म्हणाले, “अनेकदा कलाकार हे चित्रांसाठी सटल रंग वापरतात, मात्र दीपक वैद्य यांनी केलेल्या धाडसाने त्यांनी साकारलेली सर्व चित्रे ही जणू काव्याप्रमाणे भासत आहेत. आपली चित्रे विकली जावीत हा चित्रकारचा हेतू दुय्यम असून जास्तीत जास्त रसिकांपर्यंत आपली कला पोहोचावी असा त्याचा कायमच प्रामाणिक प्रयत्न असतो. आज या चित्रप्रदर्शनाला भेट दिल्यानंतर कलाकाराच्या प्रामाणिक कलेचे दर्शन मला झाले.”

भडक रंग अंगावर येत असले तरी आज अनेक कलाकारांनी या रंगाच्या वापराने जागतिक कीर्ती मिळविली आहे असे सांगत प्रो. डॉ. सुभाष पवार म्हणाले, “भारतीय संस्कृतीत आपल्याला बरेचदा भडक रंगांचा जास्त वापर दिसून येतो. भडक रंगाची आवड हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्यच असावे असे म्हणता येईल. परदेशात मात्र मडी रंग अथवा पेस्टल रंगांवर भर दिलेला आपल्याला पहायला मिळतो.”

कुठलेही चित्र, कुठलाही कलेचा प्रकार हा आपल्यात एक प्रकारची उर्जा निर्माण करतो. या उर्जेचा वापर कसा करायचा हे त्या कलाकाराच्या मूडवर अवलंबून असते. आपल्या भावना व्यक्त करायला अनेक माध्यमे आहेत, मात्र ती माध्यमे किती उत्स्फूर्तपणे व उत्कटपणे वापरायाची हे कलाकारावर अवलंबून असते. कोणत्याही कलेचा आनंद सर्वांत प्रथम त्या कलाकाराला मिळायला हवा, जर तो मिळत नसेल तर त्या कलाकाराने ते काम करू नये, असेही प्रो. पवार यांनी सांगितले.

दीपक वैद्य हे मैथिलीकुमार या टोपणनावाने चित्रे काढत असून त्यांच्या अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांच्या एकल प्रदर्शनात फुले, सिटीस्केप्स, फिग्युरेटिव्ह अॅबस्ट्रॅक्टस् यांसोबतच जॉर्जिया देशाला त्यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीवर आधारित काही चित्रे रसिकांना पाहता येणार आहेत.

दीपक वैद्य हे व्यवसायाने वास्तुविशारद असून मागील चार दशके ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्य यांना शास्त्रीय गायन, लेखन यांचीही आवड असून आजवर मराठी भाषेत त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याआधी वैद्य यांनी दोन यशस्वी चित्र प्रदर्शने केली असून सदर प्रदर्शन हे त्यांचे तिसरे एकल चित्रप्रदर्शन आहे. वैद्य यांच्या कलाकृतींमध्ये वेगवेगळ्या स्ट्रोकच्या चित्रांचे विविध आणि असंख्य पैलू समाविष्ट आहेत. याबरोबरच त्यांच्या चित्रांचे विषय, त्यामधील रंगांचा वापर हे रेषा, परिमाणे आणि रंगांच्या दृश्यीकरणातील त्यांचा व्यावसायिक अनुभव व सर्जनशीलतेची प्रचीती देतात हे विशेष.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading