जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने दोन मुलांच्या हतबल पित्याचे केली आत्महत्या
लातूर: प्रतिनिधी
जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने आपल्या मुलांना शिकवायचे कसे आणि सांभाळायचे कसे, या विवंचनेतून दोन मुलांच्या बापाने विजेचा धक्का घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रशासनाच्या सुस्त कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
निलंगा तालुक्यातील दादगी गावात राहणाऱ्या शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (वय ३२) असे या हतबल पित्याचे नाव आहे. शिवाजी हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असून त्यांची दोन मुले शाळेत शिकत आहेत. एक वर्षापासून पाठपुरावा करून देखील त्यांच्या मुलांचे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र प्रशासनाकडून मिळाले नाही.
जात प्रमाणपत्र नसल्याने कठीण परिस्थितीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही आणि अन्य सुविधांपासूनही वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत चिंतेमुळे हतबल झालेल्या शिवाजी यांनी चिठ्ठी लिहून टोकाचे पाऊल उचलले आहे.
या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शिवाजी यांचा बळी गेला असून त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
