Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणे ही मोदी आणि शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी -खासदार संजय राऊत

मुंबई: प्रतिनिधी

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणे ही सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व संबंध संपुष्टात आणल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे म्हणणाऱ्या केंद्र सरकारला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे चालते, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गट आज क्रिकेट सामन्याच्या विरोधात आंदोलन करीत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला, निरपराधांचा बळी, पुसला गेलेला सिंदूर याबद्दल छाती पिटण्याचा राजकीय कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर पार पाडला. मग आता क्रिकेट सामना खेळवला जात असताना ते सगळे कुठे गेले, असा सवाल करतानाच, मोदी, शहा यांची देशभक्ती आणि राष्ट्रवाद हे एक ढोंग असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख जय शाह यांच्या दबावामुळे हा सामना खेळवला जात आहे. त्यांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत. अनेक भारतीय खेळाडूंचा हा सामना खेळण्यासाठी विरोध आहे. मात्र, जय शाह यांनी त्यांच्यावर दबाव आणला आहे, असा दावा राऊत यांनी केला. तुम्ही देखील दबावाला बळी न पडता या एका सामन्यावर बहिष्कार टाकला तर मोदी तुम्हाला फासावर चढवणार आहेत की शहा तुमची ईडी चौकशी करणार आहेत, असा सवालही त्यांनी खेळाडूंना उद्देशून केला.

अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून तुम्ही भारत-पकिस्तान युद्ध थांबवू शकता. रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाई देखील थांबवू शकता. मग तुम्हाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना थांबवता येत नाही काय, असा सवाल राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading