Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सध्याच्या काळात महाराष्ट्रातील सामाजिक वीण उसवत असल्याचे चित्र – शरद पवार

नाशिक: प्रतिनिधी

सध्याच्या काळात महाराष्ट्रातील सामाजिक वीण उसवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊन ही वीण जपण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी देखील हे काम करावेच लागेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.

दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलन, इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण बचाव आंदोलन आणि आता हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर अन्य जातींचे आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठीचे आंदोलन, यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. समाजासमाजात तेढ निर्माण होत आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये परिस्थितीत स्फोटक बनू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांच्या या विधानाला महत्त्व आहे.

सामाजिक स्वास्थ्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने दादासाहेब गायकवाड यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे पवार यांनी नमूद केले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रोत्साहनामुळे दादासाहेब गायकवाड यांनी नोकरी सोडून समाजकारणात स्वतःला झोकून दिले. रिपब्लिकन पक्षातून ते विधानसभेवर निवडून देखील आले, याची आठवण त्यांनी करून दिली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते बिनविरोध निवडून आले. त्यावेळी रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेसची प्रथमच युती झाली. हे दादासाहेबांच्या पुढाकारांनी घडून आले. सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांचे मोठे योगदान आहे, असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading