भुजबळ – मुंडे यांनी घेतली आत्महत्या केलेल्या OBC युवकाच्या कुटुंबियांची भेट
लातूर: प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण जाण्याच्या भीतीने 35 वर्षीय भरत महादेव कराड या युवकांनी आत्महत्या केली आहे. मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रेणापूर तालुक्यातील वागदरी या गावी राहणाऱ्या कराड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरक्षणाबाबत राज्य सरकार सजग असून कोणाचेही आरक्षण जाणार नाही. त्यामुळे तरुणांनी आतातायीपणा करून टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
ज्यांना आरक्षण द्यायचे तेच आत्महत्या करू लागले तर आरक्षण द्यायचे कोणाला, असा सवाल करून मुंडे यांनी सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत तरुणांना संयम राखण्याचे आवाहन केले.
सध्याच्या काळात सामाजिक वातावरण कमालीचे दूषित झाले आहे. दोन जातीचे मित्र एकमेकांचे शत्रू बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांना गणवेशावर नावाची पट्टी लावण्यास बंदी करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला ही शोभणारी गोष्ट नाही, असे मुंडे यांनी नमूद केले.
आपल्या सर्वांना प्रयत्न करून राज्यात पुन्हा समता प्रस्थापित करावी लागणार आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे कृपा करून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलून नका, असे मुंडे म्हणाले.
