९ ते १४ सप्टेंबर दरम्यान दीपक वैद्य यांच्या ‘मेडले ऑफ डिफरंट स्ट्रोक्स’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन
पुणे : पुण्यातील चित्रकार दीपक वैद्य यांच्या अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांचे ‘मेडले ऑफ डिफरंट स्ट्रोक्स’ हे चित्रप्रदर्शन येत्या मंगळवार दि. ९ सप्टेंबर ते रविवार दि. १४ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात सकाळी ११ ते सायं ७ पर्यंत सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे याची कृपया नोंद घ्यावी.
दीपक वैद्य हे मैथिलीकुमार या टोपणनावाने चित्रे काढत असून त्यांचे अॅबस्ट्रॅक्ट अक्रॅलिक चित्रांचे एकल प्रदर्शन रसिकांना नक्की आवडेल. मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता चिंटूकर्ते म्हणून आपल्या सर्वांच्याच ओळखीचे असलेले प्रसिद्ध कार्टुनिस्ट चारुहास पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
दीपक वैद्य हे व्यवसायाने वास्तुविशारद असून मागील चार दशके ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्य यांना शास्त्रीय गायन, लेखन यांचीही आवड असून आजवर मराठी भाषेत त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याआधी वैद्य यांनी दोन यशस्वी चित्र प्रदर्शने केली असून सदर प्रदर्शन हे त्यांचे तिसरे एकल चित्रप्रदर्शन आहे. वैद्य यांच्या कलाकृतींमध्ये वेगवेगळ्या स्ट्रोकच्या चित्रांचे विविध आणि असंख्य पैलू समाविष्ट आहेत. याबरोबरच त्यांच्या चित्रांचे विषय, त्यामधील रंगांचा वापर हे रेषा, परिमाणे आणि रंगांच्या दृश्यीकरणातील त्यांचा व्यावसायिक अनुभव व सर्जनशीलतेची प्रचीती देतात हे विशेष. या चित्रप्रदर्शनात दीपक वैद्य यांची अॅबस्ट्रॅक्ट चित्रे, फुले, सिटीस्केप्स, फिग्युरेटिव्ह अॅबस्ट्रॅक्टस् यांसोबतच जॉर्जिया देशाला त्यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीवर आधारित काही चित्रे रसिकांना पाहता येणार आहेत.
