१२ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन
पुणे गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२, १३ व १४ सप्टेंबर रोजी औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक व किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण आणि द औंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वास्तुविशारद अभिजित सुभाष गायकवाड यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तीनही दिवस सायं ५ ते रात्री १० दरम्यान संपन्न होणाऱ्या या महोत्सवाचे हे १२ वे वर्ष असून महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल. महोत्सवासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेवेळी द औंध सोशल फाऊंडेशनचे सचिव शिरीष नाईकरे पाटील, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या ट्रस्टी व किराणा घराण्याच्या गायिका शाश्वती चव्हाण आणि शशी सुधांशु उपस्थित होते.
आयोजकांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार यावर्षी बेळगावचे जागतिक कीर्तीचे बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांना जाहीर झाला असून महोत्सवाच्या शेवटच्या अर्थात तिसऱ्या दिवशी तो पं. राजेंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येईल अशी माहिती अभिजित सुभाष गायकवाड यांनी दिली.
शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू आणि किराणा घराण्याचे आश्वासक गायक विराज जोशी यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक पं. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन रंगेल. तर रोंकिनी गुप्ता यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (१३ सप्टेंबर) सुरुवात पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने होईल. यानंतर पद्मश्री पं. विजय घाटे यांचे एकल तबलावादन उपस्थितांना अनुभविता येईल. पं राम देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल. रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी आरती नायक यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाला सुरुवात होईल तर प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या सादरीकरणाने १२ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा समारोप होईल.यावेळी शर्वरी जमेनीस आणि तबलावादक निखील फाटक हे ‘कथक तबल्याचा मिलाफ – कपल ऑफ मेनी थिंग्ज’ हा कार्यक्रम प्रस्तुत करतील.
