मद्यविक्री दहा दिवस बंद ठेवण्याच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती
पुणे: गणेशोत्सव काळात पुण्याच्या पेठांमध्ये १० दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार गणेश चतुर्थी, गौरी आगमन आणि विसर्जन, गणेश विसर्जन या दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे.
शहराच्या पेठांमध्ये गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. परगाव, परराज्यासह परदेशातूनही लोक गणेशोत्सव काळात पुण्यात येतात. तसेच या काळातच भांडणे आणि हिंसक प्रकारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे उत्सवकाळात फरासखाना, खडक आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवस मद्यविक्री बंद ठेवावी, असा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती.
त्यानुसार या वर्षी उत्सवकाळात या ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग १० दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केला. मात्र, शहरातील बार चालक संघटना आणि मद्य दुकानदार यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.
