रोहिणी खडसे यांच्यावर पुराव्यात फेरफार केल्याचा आरोप
चौकशी होणार, गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता
पुणे: रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपी असलेले प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर होत असून याबाबत पुणे पोलीस चौकशी करणार आहेत. या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे. त्यांच्या मोबाईल व लॅपटॉपमध्ये अश्लील चित्रण सापडले असून त्यांच्यामार्फत सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची शंका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. याबाबत सखोल चौकशीची सूचना त्यांनी पोलिसांना केली आहे.
याच प्रकरणात रोहिणी खडसे यांनी आपल्या पतीची पाठराखण केली आहे. त्यासाठी त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. कोठडीत असलेल्या पतीची ही भेट घेतली. न्यायालयातही हजेरी लावली. त्यानंतर केलेल्या चौकशीत पुणे पोलिसांना आवश्यक असलेल्या खेवलकर यांच्या व्हॉट्स ॲपमधील पुरावा ठरू शकणाऱ्या मजकूर व चित्रणात त्यांनी फेरफार केला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पुणे पोलीस यासंबंधी अधिक चौकशी करणार आहेत.
