Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… तर सरकार देखील उलथवून टाकू’ – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

जालना:  मराठा आरक्षणाबरोबरच आपल्या इतर देखील काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे दोन दिवस शिल्लक आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रसंगी सरकार देखील उलथवून टाकू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले फौजदारी गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, या आंदोलनात बलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. ती त्वरित मिळावी. या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडे 26 तारखेपर्यंत वेळ आहे. त्या मान्य झाल्या नाही तर सरकार उलथवून टाकू, असे जरांगे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. ते हे सारे मुद्दाम करीत आहेत. मागील सरकारच्या कार्यकाळात मंत्री गिरीश महाजन हे, जे मराठा तेच कुणबी, असे म्हणत होते. आता त्यांच्याच सरकारमध्ये आरक्षण मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली.

आपल्या मागण्या 26 तारखेपर्यंत मान्य न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुंबईला येणार म्हणजे येणारच! यादरम्यान सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. त्यामुळे आता कोणती पावले उचलायची हे सरकारने ठरवावे, असे त्यांनी सांगितले.

या आंदोलनासाठी मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईपर्यंत पोहोचताना किंवा पोहोचल्यावर देखील कोणीही पोलिसांची वाद घालू नका. शांततेत आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण पदरात पाडून घ्यायचे आहे. मात्र, या आंदोलनातील कोणालाही काठीने डिवचले तरी मुंबईतला एकही रस्ता मोकळा सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading