Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

BEST पतपेढी निवडणूकीत ठाकरेंना भोपळा देखील फोडता आला नाही

मुंबई: प्रतिनिधी

बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेवरील शिवसेनेची तब्बल नऊ वर्ष अबाधित असलेली एकहाती सत्ता शशांक राव यांच्या कामगार संघटनेने उलथून लावली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली असली तरी त्यांना भोपळा देखील फोडता आला नाही. राव यांच्या संघटनेने 14 तर महायुती प्रणित पॅनलने सात जागांवर विजय मिळवला.

बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ठाकरे गट आणि मनसेने एकत्रितपणे लढवलेली पहिलीच निवडणूक असल्यामुळे ती प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेचे उत्कर्ष पॅनल, महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनल आणि शशांक राव यांच्या संघटनेचे पॅनल अशी तिहेरी लढत झाली. त्यात ठाकरे गट आणि मनसेचा दारुण पराभव झाला.

या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शशांक राव यांचे अभिनंदन केले आहे. भारतीय जनता पक्षावर मात्र त्यांनी गंभीर आरोप केले. मागचा आठवडाभर आम्ही भाजपकडून पोचला जाणारा पैशाचा ओघ बघत होतो. मात्र, आम्ही बेस्ट वाचवण्यासाठी खूप धडपड केली आहे. त्यामुळे कामगार त्यांच्याकडून पैसे घेतील आणि मते मात्र आम्हालाच देतील, असा आमचा विश्वास होता. तो फोल ठरला, असे ते म्हणाले.

भाजपासारखा मोठा पक्ष एखाद्या पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्व यंत्रणा कामला लावतो आणि एवढा पैशाचा ओघ ओततो, यावरून त्यांना जे हवे ते मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी दिसून येते. याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. पैसा आणि संपर्क यात आम्ही कमी पडलो, असेही सामंत यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading