पारंपारिक वाद्यांची परंपरा जतन करणे गरजेचे – डॉ. सदानंद मोरे
पुणे : सनई, चौघडा यांसारख्या अनेक वाद्यांचे वादन हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण आणि उत्सवांना केले जाते. ही वाद्य एक प्रकारे मंगल वाद्य म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्येच एक म्हणजे शंख वाद्य हे आहे. केशव शंखनाद पथक हे केवळ शंख वादनाचा प्रचार आणि प्रसारच करत नाही, तर या वाद्याचा वारसा जपण्याचे काम करत आहे. अशाच प्रकारे हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपारिक वाद्यांची परंपरा जतन करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
केशव शंखनाद पथकाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. सचिन महाराज पवार यांना डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केशव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम प्रांताचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, पथकाचे नितीन महाजन, रणजीत हगवणे, संजू ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, व ११०००/- रुपयाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, डीजे आणि तत्सम पाश्चात्य वाद्यांच्या मागे जाणारी सध्याची तरुणाई लक्षात घेता केशव शंखनाद पथकाचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. हे पथक केवळ शंख वादन करत नाही तर अशा प्रकारच्या अनेक पारंपारिक वाद्यांची जपणूक करण्याचे आणि ती वाद्य तरुण पिढीपर्यंत नेण्याचे कार्य करीत आहे. एक प्रकारे हे पथक केवळ वाद्यांची परंपरा जपत नाही तर हिंदू संस्कृतीची परंपरा तरुण पिढीपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे.
सचिन महाराज पवार म्हणाले, वक्तृत्व कशासाठी वापरावे याचे मार्गदर्शन मला डॉ. सदानंद मोरे यांच्यामुळे मिळाले. त्यांचे मार्गदर्शन जर मिळाले नसते तर मी प्रचारकी थाटाचे वक्तृत्व केले असते. चांगले वक्तृत्व असलेले लोक अनेकदा अपकीर्तीला पोहोचतात, या प्रकारे माझी अवस्था झाली असते. परंतु डॉ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनामुळे मी हा प्रवास करू शकलो. मी डाव्या विचारांचा किंवा उजव्या विचारांचा व्यक्ती नाही, तर मी सर्व विचारधारेचा अभ्यास करून वारकरी झालेला व्यक्ती आहे. साधुसंतांचा पदर धरून आपण वाटचाल केली तर आपले जीवन निश्चितच सुंदर होते या विचारांचा मी व्यक्ती आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, केशव शंखनाद पथकाचा आलेख गेल्या नऊ वर्षांपासून चढता राहिलेला आहे. हे पथक विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून निर्माण झाले आहे, त्यामुळे केवळ शंख वादन करणे हा या पथकाचा हेतू नाही तर विश्व हिंदू परिषदेची शिकवण आणि मूल्य तरुणांपर्यंत पोहोचवणे हेतू आहे. त्यातूनच शंख वाद्यांसारखे पौराणिक वाद्याचे जतन करणे हे महत्त्वाचे कार्य करत आहे.
नितीन महाजन म्हणाले, शंख वाद्यासारखा नवीन प्रकार आम्ही प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला परंतु सुरुवातीला आम्हाला विरोध झाला. आमचा गेल्या नऊ वर्षांचा प्रवास यशस्वी झाला आहे त्यामध्ये प्रत्येक वादकाचा वाटा आहे. केवळ शंख हे वाद्य नव्हे तर हिंदू संस्कृतीमधील पारंपारिक वाद्य तरुणांपर्यंत पोहोचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
