Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

शास्त्राने सांगितल्यानुसार केलेले कर्म वैध – प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज

पुणे : श्री गणेश गीतेतील पहिल्या अध्यायात कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे. आपण जे कर्म करतो, ते वैध आहे का? हे समजून घ्यायला हवे. कर्म अवैध करतो, तर फळ तसेच मिळेल, याचा विचार आपण करायला हवा. कर्म आणि कर्मयोग यामध्ये फरक आहे. जसे शास्त्रांनी सांगितले आहे, तसे आपले कर्म असायला हवे. त्यालाच वैध कर्म म्हटले जाते, असे यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावरील निरूपणमालेचे आयोजन श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. प्रवचनमालेच्या उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ पायमोडे आदी उपस्थित होते. ट्रस्टच्या यु ट्यूब आणि फेसबुक चॅनेल वर ही प्रवचनमाला गणेशभक्तांना अनुभवण्यास मिळणार आहे.

प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, जेव्हा कर्म सुरु करू, तेव्हाच त्याचे फळ मिळणार आहे. मोरया याच कर्माची रचना सांगतात. भारतीय ग्रंथ हे तत्वज्ञान सांगण्यासाठी आहेत. उपनिषदाचा उपयोग तेव्हाच आहे, जेव्हा त्याचे आचरण करण्यात येईल. मोरयाकडे आपण केवळ व्यवहारातील मागतो. आपल्याला त्याच्याकडे श्रेयस्कर मागता आले पाहिजे. मोरया आपल्याशी तेव्हाच बोलेल जेव्हा आपण त्याचे प्रिय होवू, असेही त्यांनी सांगितले.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, श्री गणेश नामाचा महिमा अद्वितीय आणि अगाध आहे. नाममहात्म्यानंतरचा पुढील टप्पा श्री गणेश गीतेतील कर्मयोग हा असून याविषयावरील प्रवचनमालेतून गणेशभक्तांसमोर कर्मयोग उलगडण्यात येत आहे. दिनांक २४ मे पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, कर्म आणि कर्मयोग यातील फरक, कर्माचा नव्हे तर फलाचा त्याग, अवतार घेण्यामागचे प्रयोजन, अवतारातील कर्मयोग, संत संगतीचे महत्त्व, योगाचे आणि प्राणायामाचे स्वरूप अशा विविध विषयांवर विवेचन करीत श्री गणेशांनी गणेश गीतेतील कर्मयोग स्पष्ट केलेला आहे. या निरूपण मालिकेत या सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद पुंड शास्त्री महाराज करणार आहेत. तरी गणेशभक्तांनी प्रवचनमालेत मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading