Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

आता १० पुरस्कार मिळवायचे अभिनेते किशोर कदम यांचे लक्ष्य

 

पुणे : ‘नटरंग’मधल्या भूमिकेला पहिल्यांदा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर सात पुरस्कार मिळाले. आता त्याची संख्या दहा करण्याचे लक्ष्य असल्याचे प्रसिद्ध अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी सांगितले.
२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)मध्ये उमेश बगाडे लिखित आणि दिग्दर्शीत’ सिनेमॅन’ हा चित्रपट दाखवण्यात आला त्यानंतर ते बोलत होते.
किशोर कदम म्हणाले, “चित्रपटात काम करायचं असं काही कधी ठरवलं नव्हतं. पण नाटकापासून सुरुवात केल्यानंतर जेव्हा सिनेमा करत होतो त्या वेळी पहिल्यांदा पिफ या महोत्सवाबद्दल ऐकलं होतं. पहिल्यांदा नटरंग मधल्या माझ्या भूमिकेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर सात पुरस्कार मिळाले. आता त्याची संख्या दहा करण्याचे माझे लक्ष्य आहे.  तेव्हा पासून या महोत्सवासोबतचं माझं नातं आजतागायत कायम आहे.”
‘सिनेमॅन’ चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, की लहान मुले हे कॅमेऱ्यासारखेच संवेदनशील असतात.त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट तयार करताना विचार करून बनवावे लागतात. लहान मुले अनुकरण फार लवकर करतात, त्यामुळे त्यांना सिनेमा दाखवताना त्यातून त्यांना काय शिकायला मिळेल याचा विचार करून चित्रपट तयार केला. सर्वांच्याच आयुष्यात शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. शिक्षक आणि मुलांच्या नात्याबरोबरच सिनेमा सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळेल.”

‘पिफ’ महोत्सवाच्या मराठी स्पर्धा या विभागाचे निवड सदस्य असलेले विद्याशंकर जॉइस यांनी चित्रपट आणि त्याची भाषा याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आज प्रत्येक भाषा, प्रदेश आपले अस्तित्व घेऊन समोर येत आहे. यात काही गैर नाही आणि ते अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. कारण या विविध अस्तित्वांतूनच एका समग्र भारताचे अस्तित्व तयार होत आहे. या खंडप्राय देशाची ही विविधताच याची सुंदरता आहे. भारतीय सिनेमांतून ही सुंदरता समोर येत आहे आणि सिनेमा समृद्ध होत आहे.”
ते म्हणाले, की पूर्वी भारतीय सिनेमा म्हणजे केवळ हिंदी भाषेतील सिनेमांकडेपाहिले जात होते. आजही काही बाबतीत ती धारणा आहे. मात्र भारतीय सिनेमा हा मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, ओडिया अशा प्रत्येक भारतीय भाषेचा मिळून बनलेला आहे. तो फक्त हिंदीपुरता मर्यादित नाही.”

‘कुलूप’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, रुद्रप्रसाद कर्पे यांनी त्यांच्या डॉक्टर ते सिनेमाच्या प्रवासाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “लहानपणापासून मला अभिनय आणि दिग्दर्शनाची आवड होती. एम. बी. बी. एस. करत असताना मला नाटकाची आवड निर्माण झाली. एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करताना मला माझी खरी ओढ लक्षात आली. ते लक्षात येताच मी त्याचा व्यावसाय म्हणून विचार केला आणि चित्रपटसृष्टीत माझा प्रवेश झाला.”

एका महिलेची जिद्द, चिकाटी दाखवणारा माहितीपट ‘नॉक्टरनस’ हा चित्रपट ‘पिफ’मध्ये दाखवण्यात आला. दिग्दर्शिका अनुपमा श्रीनिवासन या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाल्या मॉथ या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास करणारी एका संशोधक महिला, अरुणाचल प्रदेश मधील अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात राहून काम करत असतानाचा तिचा अनुभव सांगणारा हा माहितीपट आहे.
अनुपमा म्हणाल्या, “आमचे सह-दिग्दर्शक हे मूळचे अंदमानचे आणि मी केरळमधली असल्याने आमची निसर्गाची नाळ जोडलेली आहे . आजच्या काळामध्ये शहराकडे स्थलांतरित झाल्यामुळे सतत एक खंत होती त्यामुळे पुन्हा निसर्ग अनुभवण्यासाठी आम्ही हा विषय निवडला. “ अरुणाचल प्रदेश प्रामुख्याने डोंगराळ असल्यामुळे तेथे पाऊस आणि वाहतुकीसाठी बऱ्याच समस्यांना त्यांना सामोरी जावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading