माहितीपटाचे आकृतीबंध सतत विकसित होत आहेत
माहितीपटाच्या परिसंवादात दिग्दर्शकांचे मत
पुणे : माहितीपटांचा जुना आकृतीबंध आता राहीला नसून, तो सातत्याने नवनवीन स्वरूपात पुढे येत आहे, विकसित होत असल्याचे मत आज माहितीपटांच्या परिसंवादामध्ये व्यक्त करण्यात आले. २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) आज ‘माहितीपट’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. प्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक अनुपमा श्रीनिवासन, कुलदीप बर्वे आणि सार्वनिक कौर सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
‘नॉक्टरनस’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका अनुपमा श्रीनिवासन यावेळी बोलताना म्हणाल्या, “मला चित्रपट आवडतात पण मी डॉक्युमेंटरी करण्याचे मुद्दामहून ठरवले, कारण मला कलेचे स्वातंत्र्य पाहिजे होते. एफटीआयआयमध्ये शिकल्यानंतर ६ महिन्यातच पहिला माहितीपट तयार केला.” त्या पुढे म्हणाल्या, “चित्रपट म्हणजे लोकांचे व्यवस्थापन करणे नव्हे तर स्वातंत्र्य घेऊन काम करणे. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देत असतात. त्यातून माहितीपट बनतात. माझा पहिला माहितीपट ‘आय वंडर ‘ बनवताना मी चित्रपट कसा बनवायचा हे शिकत गेले. मला कोणाला काही उत्तरे द्यायची नव्हती. मी आणि माझा कॅमेरा एवढेच हवे होते. त्यातून मी शिकत गेले. “ त्या म्हणाल्या, की आता माहितीपटाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळत असल्याने खूप गोष्टी बदलल्या आहेत. आता प्रत्येकाकडे कॅमेरे आहेत त्यामुळे माहितीपट बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे स्वरूप बदलले आहे. निधी देणाऱ्या संस्थाही आता पुढे आल्या आहेत मात्र त्यात तुमचे स्वातंत्र्य जपणे, ही कसरत करावी लागते.
‘फुल का छंद’, हा कुमार गंधर्व यांच्यावरील माहितीपट अमित दत्ता आणि कुलदीप बर्वे यांनी तयार केला आहे. बर्वे म्हणाले, की तुम्ही एकदा एका विषयाला जोडले गेलात की तुमच्याकडून काम आपोआप होत जाते. ते म्हणाले, “कुमार गंधर्व यांच्याकडे त्यांच्या रचना आणि बंदिशीच्या माध्यमातून बघायचे आम्ही ठरवले आणि मग या प्रवासात अॅलन हा चित्रकार बरोबर आला आणि अनिमेशन, आरेखनाच्या माध्यमातून आणि मध्य लय ज्याला कुमार गंधर्व स्वाभाविक लय म्हणायचे ते घेऊन त्यावर काम केले आणि माहितीपट तयार झाला. अमित दत्ता हा दिग्दर्शक आपल्या कल्पनांच्या बाबत स्पष्ट असतो. मात्र या माहितीपटाबाबत तो कल्पना येण्यासाठी एकदम खुलेपणाने पुढे आला त्यातून असा वेगळा माहितीपट पूर्ण झाला.”
‘अगेन्स्ट द टाईड’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका सार्वनिक कौर म्हणाल्या की कोस्टल रोड, मुंबई शहर आणि स्थलांतर या विषयावर माहितीपट करायचे अनेक वर्षे मनात घोळत होते. गणेश आणि राकेश हे मुंबईतील दोन कोळी भेटले आणि त्यांचे समुद्राविषयीचे प्रेम, जीवनाविषयीचा दृष्टिकोन पाहून पुढे हा क्लायमेट चेंज काय आहे, हे दाखवणारा माहितीपट तयार झाला. त्यात एक राजकीय स्थिती आहेच, पण तरीही हा माहितीपट हा केवळ कोळी समाजाचा नसून, तो माझ्यासाठीही तयार करण्यात आलेला आहे, कारण हे विस्थापन आणि हवमान बदलाचे प्रश्न प्रश्न केवळ उपेक्षित समाजाचे नसून सर्वांचेच आहेत.
