‘गायकीतील बदलांचा काळानुरूप स्वीकार, यातच परंपरेचे प्रवाहीपण’
”जयपूर गायकी – काल, आज आणि उद्या” या विशेष परिसंवादात मान्यवर कलाकारांनी मांडले मत
पुणे : “काळानुरूप होणारे गायकीतील बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारणे, यातच भारतीय संगीत परंपरेचे प्रवाहीपण आहे. गायकीचे स्वत्व जपून, कलाकारांची प्रतिभा आणि शैली, यानुसार गायकीचे स्वरूप बदलणे शक्य आहे”, असे मत मान्यवर कलाकारांनी शनिवारी येथे मांडले.
नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अकराव्या गानसरस्वती महोत्सव २०२५ अंतर्गत शनिवारी सकाळी टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘जयपूर गायकी – काल, आज आणि उद्या’, या विषयावर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर, ज्येष्ठ समीक्षक, गायक डॉ. मिलिंद मालशे, ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, पं. रघुनंदन पणशीकर, सुयोग कुंडलकर, सौरभ काडगावकर आणि राधिका जोशी यांचा सहभाग होता. डॉ. चैतन्य कुंटे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
जयपूर घराण्याची गायकी हा केंद्रबिंदू मानून, या परिसंवादात कलाकारांनी विचार मांडले. श्रुती सडोलीकर यांनी जयपूर घराण्याच्या मूळ गायकीची तसेच ध्रुपद परंपरेतील डागुर आणि गोहरबानीच्या परंपरेची माहिती दिली. ज्यांच्या नावाने जयपूर घराणे परिचित झाले, त्या उस्ताद अल्लादियाखांसाहेबांची स्वतःची तालीम, त्यांची जडणघडण, सांगीतिक संस्कार आणि कालांतराने विविध कारणांनी खांसाहेबांच्या गायकीत झालेले आणि काही त्यांनी घडवून आणलेले बदल, यांचीही माहिती त्यांनी दिली. स्वरांचे दर्जे, ठेहराव आणि तालाचा पक्केपणा ही तत्त्वे कायम ठेवत, स्वरोच्चारात त्यांनी केलेले बदल, आकारयुक्त गायकी, स्वरांमागील वजन कमावण्याचा सराव, तालातील मात्रांचे खंड भरण्याचे तंत्र, हे खांसाहेबांनी गायकीला दिलेले योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.
डॉ. मालशे म्हणाले, “जयपूर गायकी ही केवळ ध्रुपद परंपरेवर आधारित गायकी नाही. ख्यालाच्या तेव्हा प्रचलीत पद्धतीत खासाहेबांनी १९ व्या शतकात काळानुरूप बदल केले. राग, बंदिश, ताल, लय आणि स्वरोच्चारांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांनी विकसित केली”.
डॉ. अश्विनी भिडे म्हणाल्या, “जयपूर गायकीची वेगळी धारा आचरलेल्या पं. रत्नाकर पै यांनी कोणतीही बंदिश कोणत्याही तालात आणि लयीत गाता आली पाहिजे, असे सांगितले. गायकी प्रवाही असते, असावी कारण कलाकाराचे कलात्मक म्हणणे मांडण्याचे तेही एक साधनच असते. बदल हे काल आणि व्यक्तीसापेक्ष असतात”, असेही त्या म्हणाल्या.
सुयोग कुंडलकर यांनी काळानुरूप बदल घडतात म्हणूनच गायकी कालसुसंगत राहते आणि वेळोवेळी त्यामध्ये कलाकारांची प्रतिभा, तालीम, धाडसी वृत्ती, अभ्यास तसेच संशोधकीय नजर यांचेही प्रभाव पडतात, असे मत मांडले.
राधिका जोशी यांनी सांगीतिक दस्तऐवजीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत, जयपूर घराण्याच्या संदर्भातील डाॅक्यूमेंटेशनचे काम सुरू असल्याची माहिती दिली. प्रत्येक पिढीतील कलाकारांसाठी परंपरेचे स्रोत महत्त्वाचे असतात. परंपरेच्या प्रवाहात नवनिर्मितीची भर पडण्यासाठीही आधी परंपरा माहिती असणे गरजेचे असल्याने दस्तऐवजीकरणावर भर देत असल्याचे त्या म्हणाल्या.
गायक सौरभ काडगावकर यांनी गायकीमध्ये परंपरेतून आलेले सुराचा, तालाचा कायदा पाळला गेलाच पाहिजे, असे प्रतिपादन केले. नव्या पिढीत कलाकारांना राग मांडणीसाठी मर्यादित वेळ असल्याने नवी आव्हाने उभी आहेत, याचाही उल्लेख त्यांनी केला.
पं. रघुनंदन पणशीकर यांनी गानसरस्वती किशोरीताईंच्या तालमीसंदर्भातील काही उदाहरणे देत, किशोरीताईंचे जयपूर गायकीतील योगदान स्पष्ट केले. “आवाज काही काळापुरता गेल्यावर किशोरीताईंचे कलात्मक चिंतन सातत्याने सुरू होते. काळाच्या ओघात कमी झालेल्या आलापचारीला किशोरीताईंनी पुन्हा नवे आयाम दिले. त्यांची गायकी नित्यनूतन होती”, असेही ते म्हणाले.
