Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

गानसरस्वती महोत्सव –  कलापिनी कोमकली आणि नंदिनी बेडेकर यांचे बहारदार गायन

 

पुणे :  ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित होत असलेल्या गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांच्या सुमधुर गायनाने झाली. यावेळी सुशील जाधव, प्रवीण बढेकर, रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या नंदिनी बेडेकर यांच्या सुमधुर सादरीकरणाने गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रंग भरले.

पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी राग मुलतानी मध्ये तीन रचना सादर केल्या. पारंपरिक बडा ख्याल ‘बेगी यार साई या” (विलंबित एकतिल), मध्य लय बंदिश ‘लागी लागी रे सावरिया’ (त्रिताल), आणि पं.‌कुमार गंधर्व विरचित ‘दिल बेकरार है गा’ ही द्रुत त्रितालातील बंदिश, यांतून राग मुलतानी त्यांनी साकारला. त्यानंतर पं. कुमार गंधर्व यांची निर्मिती असलेल्या ‘शुद्ध श्याम’ या जोडरागातील ‘मोहे बुलाके पूछो ना रे’ (मध्यलय त्रिताल) आणि श्यामकल्याण रागातील ‘ऐसो तो मै तुम्हे जानत हू’ ही एकतालातील रचना मोजक्या वेळात पेश केली. रसिकांच्या आग्रहास्तव ‘नर्मदा रंगसे भरी होरी’ ही होरी (सतवा ठेका) गाऊन कलापिनी यांनी विराम घेतला.

त्यांना प्रशांत पांडव (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. अश्विनी पुरोहित आणि श्रीनिधी देशपांडे यांनी तानपुरा साथ केली.

किशोरीताईंविषयी कलापिनी म्हणाल्या,’ लहानपणापासून मी ताईंना ऐकत आले आहे. बाबांच्या मैफलीला त्या येत असत. मी अगदी लहान असताना बाबांपाशी हट्ट धरला होता, की मला घरी झोपाळा हवा. बाबांनी खास माझ्यासाठी आमच्या देवासच्या घरी बागेत झूला तयार करवून घेतला. एकदा पावसाळ्यात किशोरीताई देवासला आल्या होत्या, तेव्हा लहानपणच्या मला त्या झोपाळ्यावर बसवून त्यांनी झुलवले होते, हे माझे भाग्य होते. माझ्या आयुष्यातील ही अतिशय गोड आठवण आहे,”.

त्यानंतर अनेक वर्षांनी अमोल पालेकर यांनी ताईंवर केलेल्या माहितीपटाच्या हिंदी अनुवादाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हा अनुवाद करताना मला जो मजा आला, जो आनंद मिळाला, तो विलक्षण होता. ताईंचे सांगीतिक भावविश्व उलगडून सांगताना, भावानुवाद नेमका हवा, यासाठी मी खूप काळजी घेतली,” अशी आठवणही कलापिनी यांनी सांगितली.

यानंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी नंदिनी बेडेकर यांनी आपली गायनसेवा सादर केली.

किशोरीताईंना त्यांच्या हयातीत हा महोत्सव सुरू झाल्याचे पाहता, अनुभवता आले, हे श्रेय रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आहे. गुरुंच्या नावाने महोत्सव सुरू करणे आणि तो सातत्याने सुरू ठेवणे, हे शिवधनुष्य रघुदादाने यशस्वीपणे पेलले आहे, हे स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दांत नंदिनी बेडेकर यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले.

नंदिनी बेडेकर यांनी राग यमन मध्ये ‘मो मन लगन लागी’ ही रचना सविस्तर मांडली. यमनचे रागरूप त्यांनी उत्तम आलापचारीतून उभे केले. नंतर ‘सखी एरी आली पिया बिन ‘ ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी सादर केली. त्याला जोडून तराणाही त्यांनी पेश केला.

त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी पूरक साथसंगत केली. स्वप्ना नायर आणि दृष्या नायर यांनी तानपुरा साथ केली.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading