ज्येष्ठ संवादिनीवादक पं. प्रमोद मराठे व डॉ. अरविंद थत्ते यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार प्रदान
पुणे : : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ संवादिनीवादक पं. प्रमोद मराठे व डॉ. अरविंद थत्ते यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, बिभास आमोणकर आणि तेजश्री आमोणकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांचे हे नववे वर्ष आहे.
कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार दिला जातो. २५ हजार व मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराचे स्वरूप आहे. कर्वेनगर येथील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. दोन्ही संवादिनी वादकांनी किशोरीताईंच्या नावाने असणाऱ्या या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
