गानसरस्वती महोत्सवात रसिकांनी अनुभवला नादसौंदर्याचा आगळा आविष्कार
सतारीच्या झंकारांनी गानसरस्वती महोत्सवाचा स्वरमंडप निनादला
राहुल देशपांडे यांचा ‘जोगकंस’ही रंगला
पुणे : इमदादखानी घराण्याचे ख्यातनाम संगीतकार आणि वादक उस्ताद शुजात हुसैन खान यांच्या सतारीच्या झंकारांनी गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात रसिकांना वैविध्यपूर्ण नादसौंदर्याचा अनुभव मिळाला.
उस्ताद शुजात खान यांनी समयोचित असा राग झिंझोटी सादर केला. आलाप, जोड, झाला या क्रमाने वादन करत स्वरमंडप त्यांनी सतारीच्या झंकारांनी भारून टाकला. साथसंगतीला दोन तबलावादकांमुळे वादनात लयकारीचा पुरेपूर आनंद रसिकांना मिळाला.
तालाचे विविध खंड पाडून, लयीचे अनेक पॅटर्न त्यांनी सादर केले. द्रुत आणि अतिद्रुत लयीतील त्यांच्या जुगलबंदीसदृश वादनाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. वादनाचा समारोप करताना त्यांनी एक गजल ऐकवली. तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना है, मै एक शाम चुराऊ अगर बुरा ना लगे….ही रचना आणि ‘बहुत दिन बीते सैया तोहे देखे’ ही छोटी रचना सादर करून त्यांनी वादनाचा समारोप केला तेव्हा रसिकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली.
किशोरीताईंना आदरांजली अर्पण करताना ते म्हणाले,” मी लहानपणापासून ताईंच्या घरी वडिलांसोबत जात असे. ताईंच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा मी चाहता होतो आणि आजही आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. आमच्या परंपरेत संपूर्ण मालकंस वाजवला जात नसे. मला तो ताईंकडून शिकता आला. त्यांचे अवघे व्यक्तीमत्व प्रेरणादायी होते. माझ्या आठवणीतील किशोरीताईंना मी ही मैफल समर्पित करतो,”.
त्यांना अमित चौबे आणि सपन अंजारिया (तबला) यांनी रंगतदार साथ केली.
गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग जोगकंस मध्ये ‘खेलन आयो री’ हा बडा ख्याल आणि त्याला जोडून द्रुत बंदिश बंदिश सादर केली. त्यानंतर पं. कुमार गंधर्व यांची बसंत सोहनी रागातील ‘बनरायी बोरा’ ही मध्य तीनतालातील रचना त्यांनी गायिली.
त्यांना निखिल फाटक (तबला) मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), शिवाजी (टाळ) यांनी साथ केली तसेच निमिष उत्पात आणि अभिजीत हळबे, यांनी तानपुरा साथ केली.
