Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेने मिळवले ‘यक्षप्रश्न’ या राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे विजेतेपद

पुणे – भाषा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘यक्षप्रश्न’ या राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे विजेतेपद पुण्यातील अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेने मिळवले असून सिटी प्राईड स्कूल, निगडी व भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर, पुणे या शाळांनी स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील गणेश सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत राज्यातून ४० हून अधिक शाळांनी भाग घेतला होता.

शहरी व ग्रामीण तसेच दुर्गम भागांतील शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वी या गटातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व संशोधन वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने गेली अकरा वर्षे भाषा फाउंडेशनतर्फे ‘यक्षप्रश्न’ या राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. टेल ऑफ सिटीज अर्थात गोष्टी गावांच्या हा यंदाच्या स्पर्धेचा विषय होता. अशी माहिती भाषा फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती राजे यांनी दिली.

स्पर्धेचे क्विझ मास्टर म्हणून मेघश्याम शिरोडकर यांनी काम पहिले. स्पर्धेत पुण्याबाहेरील १० शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये इचलकरंजी, सोलापूर, मुंबई येथील शाळांचा सहभाग होता. कोकणातील सुधागड तालुक्यातील नेणवली येथील आदिवासी शाळा व महानॅब भावना चांडक ब्लाइंड स्कूल, नाशिक या अंध शाळेच्या मुलींचा स्पर्धेतील सहभाग लक्षणीय होता.

स्वरा भोळे, इरा जोगळेकर, नील चाफेकर व आराध्या देव यांचा समावेश असलेल्या अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेने यावर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरले. पहिल्या तीन विजेत्या शालेय संघांना ट्रॉफी प्रदान करण्या आली. तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना शाळेच्या ग्रंथालयासाठी भरघोस पुस्तके, व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित बक्षीस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एस जे कॉन्ट्रॅक्टस्, लीना पिंपळे, पूर्वा नृत्य आकृती व केक स्टुडिओ आदी संस्थांचे प्रतिनिधी व भाषा फाउंडेशनचे पदाधिकारी स्वाती व जयदीप राजे पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading