भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धनासाठीचा पहिला ‘जंगल बेल्स’ पुरस्कार जाहीर
सुनील लिमये, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (आयएफएस), नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी (आयएफएस) व अनुज खरे, मानद वन्यजीव वार्डन या त्रिसदस्सीय पुरस्कार निवड समितीने भावना मेनन यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कारासाठी देशभरातून ३० हून अधिक अधिक अर्ज आले होते. या क्षेत्रात काम करत असणाऱ्या फक्त महिलांसाठीचा हा पहिलाच रोख रक्कम असणारा पुरस्कार आहे. येत्या १७ फेब्रुवारीला सेवा भवन, पटवर्धन बाग येथे होणाऱ्या एका विशेष समारंभात पुण्याचे मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण (आयएफएस) यांच्या हस्ते मेनन यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
गेली १५ वर्षे भावना मेनन या वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करत आहेत. मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना या क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे. यासंबंधी मध्य प्रदेश मधील कान्हा व पन्ना या व्याघ्र प्रकल्पात त्यांनी केलेल्या उपाययोजना उल्लेखनीय आहेत. पारधी व आदिवासी बैगा समाजाला अर्थार्जनाचे विविध पर्याय देवून त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे व जगण्यासाठी जंगलावरील त्यांचे अवलंबत्व कमी करणे यामध्ये मेनन यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे, अशी माहिती संजय देशपांडे यांनी दिली.
बांधवगढ व्याघ्रप्रकल्पाजवळ असलेल्या शाळकरी मुलांच्या सहभागाने शाळेचा आवारात ३०० हून अधिक देशी झाडांची लागवड करून ती जगवली तो प्रकल्प, उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगींवर वन खात्याच्या मदतीने केलेल्या उपाययोजना, तसेच जंगलातील आदिवासींच्या कलावस्तू शहरांमधील मुख्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देणारा ‘पशुपक्षी’ उपक्रम आदी प्रयत्नांबरोबरच भावना मेनन सध्या वाइल्ड पाईन या उपक्रमांतर्गत पन्ना येथील पारधी समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत. वन्यजीव संवर्धन क्षेत्रात इतर संस्था व व्यक्तींनी केलेल्या कामाची दाखल घेऊन मेनन त्यावर सातत्यने लिखाण करत असतात.
