हिंद गंधर्व संगीत महोत्सवाने होणार तुळशीबाग मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ
पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी सन २०२५ साली शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने हिंद गंधर्व संगीत महोत्सव आणि सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, बांधकाम व्यावसायिक सुशीलकुमार देशमुख, राजेश गिरे, सुभाष सरपाले मंडळाचे विश्वस्त दत्ताभाऊ कावरे, मोहन साखरीया, राजेश दातार, अभिनेत्री वाळके, मयूर दिवेकर, साई डोंगरे, प्रतिक इप्ते, चकोर सुबंध यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वागत समिती करण्यात आली असून प्रख्यात उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच इतर मान्यवरांचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, तब्बल १३० वर्षांहून अधिक काळाची गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आपल्या पुण्यनगरीस लाभलेली आहे. दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक पद्धतीने संपन्न होत असतो. अशा या सांस्कृतिक पुण्यनगरीतील श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या १२५ व्या वर्षा निमित्त विविध उपक्रम होणार आहेत. त्याची सुरुवात हिंद गंधर्व संगीत महोत्सवाने होत असून त्यानंतर भव्य आरोग्य शिबिर आणि श्री गणेश जन्म सोहळा थाटात साजरा करण्यात येणार आहे.
नितीन पंडित म्हणाले, शुभारंभ सोहळा मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते बोधचिन्हाचे अनावरण होईल. बुधवार, दि.२९ जानेवारी रोजी शास्त्रीय गायक राजेश दातार यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि गुरुवार, दि.३० जानेवारी रोजी गायक जितेंद्र्र भुरूक आणि सहकारी यांचा सिनेसंगीताचा गितोंका सफर हा कार्यक्रम होईल. हे दोन्ही कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात रात्री ९ वाजता होणार आहे.
शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी तुळशीबागेत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध आरोग्य विषयक तपासणी होणार आहेत. शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने दुपारी १२.३० वाजता गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता पालखीतून गणपती बाप्पाची नगर प्रदक्षिणा होईल. सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
