उस्ताद शुजात खान यांच्या सतारवादनाने वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा झाला समारोप.
पुणे : इटावा घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद शुजात खान यांनी गायली अंगाने केलेल्या सतारवादनाने आज वसंतोत्सवच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात १९ जानेवारी पर्यंत १८ वया वसंतोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे तो संपन्न होत आहे.
आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा समारोप उस्ताद शुजात हुसैन खान यांच्या सतारवादनाने झाला. या सत्रात शूजात खान यांनी राग वाचस्पती सादर केला. दाक्षिणात्य संगीत परंपरेतून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आलेल्या रागांपैकी वाचस्पती हा एक राग आहे. या रागात कलावती, जनसंमोहिनी आणि यमन या रागांची छबी दिसते असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला मोजकी आलापी आणि जोड, झाल्याच्या मांडणीने त्यांनी सर्व रसिकांना खिळवून ठेवले. यानंतर उस्ताद फैयाज खान यांची ‘डगर चलत मोसे’ या बंदिशीचे थोडक्यात गायन आणि नंतर गायकी अंगाने सतारवादन केले. त्यांना मुकेश जाधव आणि अमित चोभे यांनी तबल्यावर साथ केली.
आज महोत्सवासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, सुप्रसिद्ध व्हायोलिन तेजस व राजस उपाध्ये आदी उपस्थित होते. केंद्रीय नागरी नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आज महोत्सवाला भेट दिली.
स्नेहल दामले आणि विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
