लाखो रुपयांच्या विदेशी बनावटीच्या पेन्सची पुणेकरांना भुरळ
आठव्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे उद्घाटन.
पुणे : नाजूक कलाकुसर असणारी एखादी वस्तू तयार करण्यासाठी अनेक महिन्यांचा अवधी लागत असल्याच्या चर्चा आपण कायम ऐकतो, हीच गोष्ट फाउंटन पेनच्या बाबतीत देखील खरी आहे. जपानी कलाकारांनी रुशी कलेचा वापर करून तयार केलेले तीन लाख रुपयांच्या फाउंटन पेन बरोबरच आकर्षक डिझाइन असणारी लाखो रुपयांची पेन्स आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवात पुणेकरांना पाहता येत आहेत. पुण्यातील रायटिंग वंडर्सच्या व वीनस ट्रेडर्सच्या वतीने १८ आणि १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे उद्घाटन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मगरपट्टा सिटी गृपचे संचालक सतीश मगर, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सुशील जाधव, सी.टी. पंडोल अँड सन्सचे कावास पंडोल, बी. यू. भंडारीचे शैलेश भंडारी, पेन संग्राहक प्रो. यशवंत पिटकर, युसुफ मन्सूर, डॉ. रणजीत जगताप, महोत्सवाचे आयोजक प्रमोद व सुरेंद्र करमचंदानी उपस्थित होते.
पेलिकन या कंपनीने तयार केलेले एम – १००० रेड इन ब्लॅक इन्फिनिटी हे तीन लाख रुपयांचे पेन या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे. जपानी कलेचा वापर करून हे पेन तयार करण्यात आले असून ते तयार करण्यासाठी रुशी आर्टचा वापर करण्यात आला आहे. या पेनची निर्मिती करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागत असल्याचे अनिश तोडरवाल यांनी संगितले. या पेनचे निब हे १८ कॅरेट सोन्याचे आहे. याखेरीज टोलेडो आर्टचा वापर करून तयार करण्यात आलेले सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे पेन या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण ठरत आहे. सोने आणि चांदीचे प्लेटिंग ही या पेनची खासियत आहे. सुवशन आर्ट चा वापर करून तयार करण्यात आलेल्या दोन लाख १५ हजार रुपयांची किंमत असणाऱ्या पेनची लिमिटेड एडिशन या महोत्सवात ठेवण्यात आली असून जगभरात विक्री करण्यासाठी फक्त ८८८ पेन्स तयार करण्यात आल्याचे तोडरवाल यांनी नमूद केले.
वोल्ड्मन या १०० वर्षाहून जुन्या असणाऱ्या पेन तयार करणाऱ्या कंपनीचा मॅनेजर हा चांदीचा पेन सगळ्याचे लक्ष वेधून घेतो. हे संपूर्ण पेन चांदीचे असून त्याचे निब सोन्याचे आहे. या पेनमध्ये शाई भरताना त्यामध्ये आवाज येतो, सव्वा लाख रुपये अशी त्याची किंमत आहे. या खेरीज रोमन डिझाइन असणारे ग्लॅडिएटर पेन, युरोपियन कलाकारांची सही असणारे एक लाख ४१ हजार रुपये किमतीचं पेन प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे. या महोत्सवात स्वामी दयानंद सरस्वती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम आणि पु. ल. देशपांडे यांची स्वाक्षरी असणारी पेन्स देखील उपलब्ध आहेत.
अक्षर चांगले ठेवण्यासाठी फाउंटन पेन चांगले काम करते, आपल्याकडे ५०० पेक्षा अधिक पेन्सचा संग्रह असल्याचे फत्तेचंद रांका यावेळी म्हणाले. आयुष्य उज्वल करण्यासाठी पेन महत्वाचे काम करते. त्यामुळे बॉलपेनपेक्षा फाउंटन पेन हे उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले. सध्याचे युग हे ऑनलाईन युग असून त्यादृष्टीने व्यवसाय करण्याची तयारी हवी व नव्या संकल्पना राबवयाला हव्यात, असे मत रांका यांनी यावेळी व्यक्त केले.
फोटो ओळ – रायटिंग वंडर्सच्या वतीने डी. पी. रस्त्यावरील सिद्धी गार्डन येथे रविवार दि. १९ जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन केले आहे. उद्घाटनानंतर प्रदर्शनातील विविध प्रकारचे पेन बघताना मान्यवर. डावीकडून सतीश मगर, सुरेंद्र करमचंदानी, फत्तेचंद रांका व सुशील जाधव.
