Monday, June 8, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘अग्नि’ लाईव्ह बँडच्या दमदार सादरीकरणाने १८ व्या ‘वसंतोत्सव’ला सुरुवात

पुणे  : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवला ‘अग्नि’ लाईव्ह बँडच्या दमदार सादरीकरणाने आजपासून सुरुवात झाली. येत्या रविवार दि. १९ जानेवारी पर्यंत कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे १८ वा वसंतोत्सव संपन्न होणार असून शास्त्रीय गायन, तालवाद्य, लाईट म्युझिक, लाईव्ह बँड यांबरोबर बहारदार गझल्स अशा एकाहून एक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी यादरम्यान रसिकांना अनुभविता येणार आहे.

आज महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दीपप्रज्वलन करीत महोत्सवाला सुरुवात आली. यावेळी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, किरण ठाकूर,अतुल अष्टेकर, जय व विजय काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन संपन्न झाले. यानंतर आपल्या नावाजलेल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अग्नि या लाईव्ह बँडचे सादरीकरण झाले.

बँडचे प्रमुख भरत स्वामी आणि सह कलाकारांनी यावेळी स्वरचित रचना सादर करीत पुणेकरांना आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडले. एक वेगळाच उत्साह या दरम्यान रसिकांमध्ये पहायला मिळाला.

बँडमध्ये बँडचे संस्थापक भरत स्वामी, शेरॉन हरबट (लीड गिटार), जस्टिन क्रेस्टो (रिदम गिटार), गॅब्रियल (बेस गिटार), अथर्व (की बोर्ड), अँडी (ड्रम्स), तन्वी इंगवले, गायत्री दीलिपन व आर्यन (बॅक अप वोकल) यांचा सहभाग होता.

अग्नि बँडच्या ‘अनलिशिंग द मॉनस्टर…’ या नव्या अल्बम मधील रचना प्रस्तुतीने सादरीकरणाला सुरुवात झाली. भरत स्वामी यांनी १९८९ च्या आसपास पुण्यातील भारती विद्यापीठ महाविद्यालयात अग्नि बँडला सुरुवात केली असल्याचा काही आठवणी सांगत बँडच्या संस्थापकांबद्दलच्या माहितीला उजाळा दिला. २०१६ साली मानसिक नैराश्याच्या आपल्या काळामध्ये लिहिलेला ‘मॉन्स्टर विथिन’ हे गाणे आणि आजवर लिहिलेले एकमेव प्रेम गीत  ‘लॉस्ट इन टाईम’ देखील त्यांनी सादर केले. यानंतर त्यांनी व्यसन या विषयावर लिहिलेल्या ‘हे यू…’ ट्रकचे सादरीकरण केले.याबरोबरच त्यांनी सादर केलेल्या स्क्रीन टाईम विथ फायर.. आणि ‘स्वेअर विथ मी…’ हे ट्रक्स उपस्थितांना विशेष आवडले. भारतीय व कर्नाटक संगीताचा मेळ घालत त्यांनी काही रचना सादर केल्या. 

 

स्नेहल दामले आणि विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading