Wednesday, September 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई-दिवेआगर रो-रो सेवेला हिरवा कंदील; जेट्टीला मंजुरी


मुंबई प्रतिनिधी : मुंबई आणि कोकणातील प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, मुंबईतील भाऊचा धक्का ते दिवेआगर अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवेआगर येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी उभारण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
या सेवेमुळे मुंबईहून दिवेआगरला थेट जलमार्गाने प्रवास करता येणार असून, प्रवाशांना स्वतःची वाहनेही सोबत घेऊन जाता येणार आहेत. त्यामुळे श्रीवर्धन, दिवेआगर आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः कुटुंबासह कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

मुंबई-कोकण प्रवासासाठी सध्या रस्ते आणि रेल्वेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने प्रवासाच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणेशोत्सव आणि अन्य सणांच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ही समस्या अधिक तीव्र होते. दुसरीकडे, रेल्वे प्रवासासाठी गर्दीच्या काळात तिकीट मिळविणेही प्रवाशांसाठी आव्हान ठरते.
कोकणासाठी जलवाहतूक सुविधा वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. दिवेआगर जेट्टीला मिळालेली मंजुरी या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

रोहा रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रोहा रेल्वे स्थानकही लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे. स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या धर्तीवर प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पुनर्विकासामुळे रोहा रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून, कोकणातील आधुनिक सुविधांनी विकसित होणारे महत्त्वाचे स्थानक म्हणून त्याचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading