गणेश विसर्जनासाठी १० हजारांहून अधिक पोलिस तैनात; ३५०० कॅमेरे, एआय-फेस रिकग्निशन, ड्रोन अन् जीपीएस ट्रॅकिंग
पुणे : गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. २५ सप्टेंबरच्या विसर्जन मिरवणुकीसाठी १० हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, ३५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, एआय आधारित व्हिडिओ विश्लेषण, फेस रिकग्निशन सिस्टीम, ड्रोन आणि जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवली जाणार आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. फरासखाना पोलिस ठाण्यात स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात आली असून, तिचा शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरशी (आयसीसीसी) थेट समन्वय राहणार आहे.शहरातील गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील भागांवर ३५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. एआय प्रणालीच्या मदतीने संशयास्पद हालचाली, संभाव्य शस्त्रे, बेवारस वस्तू, हिंसाचार, आग किंवा धूर यासारख्या घटनांची माहिती तातडीने मिळणार आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची उपलब्ध नोंदींशी जुळवणी करण्यासाठी फेस रिकग्निशन प्रणालीचाही वापर केला जाणार आहे.
मोबाईल व्हॅनमधूनही नजर
सीसीटीव्ही यंत्रणेला पाच मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि १९ मिनी सर्व्हेलन्स वाहनांची साथ मिळणार आहे. एचडी कॅमेरे, एआय विश्लेषण आणि सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणांनी सज्ज असलेल्या या वाहनांमधून नियंत्रण कक्षाला थेट माहिती पाठविली जाणार आहे.
आकाशातूनही ‘वॉच’
मिरवणुकीवर हवाई नजर ठेवण्यासाठी मायक्रो आणि लहान श्रेणीतील ड्रोन तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीची हालचाल, इमारतींची छते तसेच आपत्कालीन परिस्थितीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल. संवेदनशील ठिकाणी अनधिकृत ड्रोन शोधण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी अँटी-ड्रोन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात येणार आहे.
६०० हून अधिक मंडळे मिरवणुकीत
मध्य पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत ६०० हून अधिक गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावर २६७, टिळक रस्त्यावर २३१, कुमठेकर रस्त्यावर ५० आणि केळकर रस्त्यावर ७९ मंडळांचा सहभाग राहणार आहे. पाच मानाचे गणपती तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी बैठका घेऊन नियोजन केले आहे.‘मिरवणूक किती वेळात संपते यापेक्षा गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची व मंडळांची सुरक्षा आणि मिरवणूक शांततेत पार पडणे हे पोलिसांचे प्राधान्य आहे,’ असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
२५० ठिकाणी सूचना यंत्रणा
गर्दीचे नियमन आणि नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी २५० हून अधिक ठिकाणी आयपी आधारित सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्याद्वारे वाहतूक बदल, गर्दीचे नियमन आणि आपत्कालीन संदेश प्रसारित केले जाणार आहेत.
गणेश मंडळांचे जीपीएस ट्रॅकिंग
मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांचे जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. मंडळांचे स्थान, हालचाल आणि थांबे यांची रिअल-टाइम माहिती पोलिसांना मिळणार असल्याने मिरवणुकीच्या प्रगतीनुसार बंदोबस्ताचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
मेटल डिटेक्टरपासून ध्वनिप्रदूषण नियंत्रणापर्यंत
महत्त्वाच्या आस्थापना, प्रवेशद्वारे, गणेश मंडळे आणि मिरवणूक मार्गांवर ३० डोअर-फ्रेम आणि १०० हँड-हेल्ड मेटल डिटेक्टर तैनात केले जाणार आहेत. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अलका चौकात सुमारे १२० ध्वनिपातळी मापक आणि कायमस्वरूपी ध्वनिपातळी निरीक्षण केंद्राचा वापर केला जाणार आहे.
