राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे! – योगेश देशपांडे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण माझ्यासाठी शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. देशभरातील सुमारे ९० पुरस्कार विजेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारताना मन अक्षरशः भरून आलं. अशी भावना दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी व्यक्त केली.
यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच दिल्लीबाहेर, गुजरातमधील एकता नगर येथे झाला. स्टॅच्यू ऑफ युनिटी, नर्मदा नदी आणि सरदार सरोवराच्या सान्निध्यातला हा संपूर्ण अनुभवच वेगळा होता. पुरस्काराचा अभिमान आहे च मात्र, सोहळ्यानिमित्त इथे आलेला अनुभव आणि माणसांचा सहवास अधिक समृद्ध करणारा ठरला.
आदित्य धर, यामी गौतम, कार्तिक आर्यन, रणदीप हुडा यांसारख्या कलाकारांपासून भारतबाला गणपथी यांच्यासारखे कल्तमक जाहिरातपट निर्माते, विविध प्रादेशिक संगीतकार, गायक, लेखक, तंत्रज्ञ अशा अनेकांशी पहिल्यांदाच भेट झाली. गंमत म्हणजे पहिल्यांदा भेटूनही अनेकांशी वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखं वाटलं.
या व्यासपीठाचं वैशिष्ट्यच हे आहे की इथे देशभरातील वेगवेगळ्या भाषांमधले कथाकार, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार एकत्र येतात आणि आपल्या कथा, अनुभव आणि विचार शेअर करतात. प्रत्येकाची कथा सांगण्याची दृष्टी किती वेगळी असू शकते, हे जवळून अनुभवता आले.
एक प्रादेशिक दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी हा अनुभव खूप मोठा शिकण्याचा टप्पा आहे. आपल्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये किती विलक्षण कथा, व्यक्तिरेखा आणि विषय दडलेले आहेत, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा माझा दुसरा चित्रपट आणि त्याला मिळालेला राष्ट्रीय सन्मान, ही माझ्यासाठी अत्यंत मोठी आणि भावूक करणारी गोष्ट आहे. पण हा सन्मान माझ्या प्रवासाचा आरंभ आहे असे वाटते, आता आणखी चांगल्या, वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या कथा सांगण्याची ही सुरुवात आहे, असे वाटते.
या पुरस्काराने माझं जग नक्कीच बदललं आहे. आता या नव्या जगाकडे पाहण्याची आणि त्यातून काहीतरी नवं निर्माण करण्याची माझी जबाबदारीही वाढली आहे. असे देशपांडे यांनी सांगितले.
