Tuesday, September 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आयआयटी बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या केंद्रस्थानी


मुंबई : आयआयटी बॉम्बेतील बीटेक विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. 18 सप्टेंबर रोजी कॅम्पसमधील परीक्षा हॉलपासून वसतिगृहापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून, साहिलच्या मृत्यूपूर्वीच्या घडामोडी समजून घेण्यासाठी त्याचा बारकाईने तपास केला जात आहे.
यवतमाळचा रहिवासी असलेला 22 वर्षीय साहिल हा आयआयटी बॉम्बेच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. 18 सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह वसतिगृह क्रमांक चारमधील खोलीत छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

साहिलला त्याच दिवशी मिड-सेमिस्टर परीक्षेदरम्यान मोबाइल फोन वापरताना पकडण्यात आले होते. त्याने प्रश्नपत्रिकेचा काही भाग ChatGPT वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेकडून सुरुवातीला सांगण्यात आले होते. परीक्षा पर्यवेक्षक प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांनी साहिलला समज दिली होती. या घटनेचा त्याच्या करिअरवर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितल्याचे आयआयटीकडून स्पष्ट करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर तत्काळ कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नसल्याचे संस्थेने म्हटले होते.
दरम्यान, तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार परीक्षा संपण्याच्या काही मिनिटे आधीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुपारी साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास साहिल काहीतरी पाहण्यासाठी खाली वाकल्याचे दिसत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर प्राध्यापकाने त्याच्याकडे विचारणा केली आणि त्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे नेल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी परीक्षा केंद्रापासून साहिलच्या वसतिगृहापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे. त्यानुसार, परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर साहिल दुपारी सुमारे 1.25 वाजता आपल्या खोलीत पोहोचला. त्यानंतर तो पुन्हा खोलीबाहेर आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले नाही. पुढे खोली उघडण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह आढळला.
या प्रकरणाचा तपास आता पवई पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येत आहे. एसीपी धर्मवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी साहिलच्या वसतिगृहातील खोलीची सखोल पाहणी करून पंचनामा केला. त्याने कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येपूर्वीची नोंद ठेवली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसून, साहिलचा मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.
साहिलच्या पालकांनी त्याच्यावर जातीय भेदभाव, छळ आणि मानसिक दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला, संचालक तसेच अन्य अधिकाऱ्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपांची सत्यता तपासण्याचे काम आता गुन्हे शाखेकडून केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचे निर्णय
साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर संस्थेने विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य केल्या. यामध्ये घटनेची स्वतंत्र चौकशी, विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक सुविधा मजबूत करणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासह विविध उपायांचा समावेश आहे.
दरम्यान, प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्याकडील डीनपदाची जबाबदारी तातडीने काढून घेण्यात आली आहे. संस्थेने या घटनेबाबत यापूर्वी जारी केलेल्या निवेदनाबद्दलही दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापक संघटनेने प्राध्यापक दुल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल उपकरणे आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे गुन्हे शाखेच्या तपासाकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading