अनमोल बिष्णोई याचे नाव पुढे करून पोलीस काहीतरी लपवत आहेत – झिशान सिद्दिकी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्येमागे बिल्डर लॉबीचा हात असून पोलिसांनी त्या दृष्टीने काहीच तपास केला नाही. या प्रकरणात अनमोल बिष्णोई याचे नाव पुढे करून पोलीस काहीतरी लपवत आहेत, असा आरोप सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी केला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वादावरून बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याचा संशय आपल्याला असून काही संशयित बांधकाम व्यवसायिकांची नावे आपण पोलिसांकडे दिली होती. मात्र पोलिसांनी त्यादृष्टीने तपासही केला नाही. आपण संशय व्यक्त केलेल्या बांधकाम व्यवसायिकांना बोलावून त्यांची चौकशी देखील केली नाही. लॉरेन्स बिश्नोई याला क्लीन चिट देऊन पोलिसांनी सारे खापर त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर फोडले आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी अडीच हजार पानांपेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना अटक होण्यापूर्वीच पोलीस या गुन्ह्याबद्दल विशिष्ट थिएरी कसे मांडू शकतात असा सवालही सिद्दिकी यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे दोन मारेकरी जागेवरच जेरबंद करण्यात आले. शुभम लोणकर याने या खुनाचा कट रचून मारेकऱ्यांना शस्त्र पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. लोणकर हा बिश्नोई टोळीचा हस्तक आहे. त्याने बिश्नोई टोळीच्या आदेशावरून हा हल्ला घडवून आणला, असा दावा केला जात आहे. अभिनेता सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांच्या मैत्रीचा संबंध देखील या हत्या प्रकरणाशी जोडला जात आहे. बिश्नोई टोळीच्या मारेकर्यांनी सलमान खानच्या घरावर देखील गोळीबार केला होता. त्यानंतर सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रकार घडला.
