‘याँडर हब’ या पुण्यातील अद्ययावत हायड्रोजन पॉवर सोर्स फॅक्टरीचे उद्घाटन
पुणे : अडोर ग्रुपचा एक प्रमुख विभाग अडोर पॉवरट्रॉन लि. हरित हायड्रोजन उर्जा उपाययोजनांना समर्पित याँडर हब या अद्ययावत केंद्राचे साभिमान उद्घाटन करत आहे. पुणे येथे स्थित या नव्या केंद्राची वार्षिक उत्पादन क्षमता तब्बल ५०० मेगावॅट इतकी असून IGBT, SIC तसेच पारंपरिक थायरिस्टर तंत्रज्ञानांच्या वापरातून MW-स्केल ट्रान्सफॉर्मर्स व रेक्टिफायर्सची निर्मिती करणे हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. या प्रगत यंत्रणा हरित हायड्रोजन निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलायझर्सना ऊर्जा पुरविणाऱ्या असून भारताच्या हरित ऊर्जा परिवर्तनाप्रती अडोर समूहाची बांधिलकी पुन:प्रस्थापित करणाऱ्या आहेत.
याँडर हबच्या उद्घाटनाला ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त (राजदूत) फिलिप ग्रीन OAM यांची सन्माननीय उपस्थिती लाभली, ज्यांच्या उपस्थित राहण्यामुळे ऊर्जा संक्रमण क्षेत्रामध्ये भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढते सहयोगीत्व अधोरेखित झाले. याप्रसंगी बोलताना श्री. ग्रीन यांनी जागतिक शाश्वत ऊर्जा उपक्रमांना चालना देण्यासाठी दोन्ही देशांमधील सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले व हवामान बदलाच्या समस्येला हाताळण्यामध्ये अशाप्रकारच्या भागीदारीच्या महत्त्वावर भर दिला.
भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय नाते गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या विकसित झाले आहे व ते २०२० मधील ‘धोरणात्मक भागीदारी’पासून सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी (Comprehensive Strategic Partnership – CSP) मध्ये परिवर्तीत झाले आहे. या विकसित होत असलेल्या भागीदारीचे लक्ष्य प्रामुख्याने २०२३ ऑस्ट्रेलिया-भारत क्रिटिकल मिनरल्स इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिपवर केंद्रित आहे, ज्यात संयुक्त गुंतवणूकीसाठी पाच महत्त्वपूर्ण प्रकल्प निवडले गेले आहेत, ज्यातील दोन प्रकल्प लिथियमवर तर तीन कोबाल्टवर केंद्रित आहेत. दोन्ही देशांची ऊर्जा सुरक्षा भक्कम करण्याच्या व अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकाराची जोपासना करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अडोर पॉवरट्रॉन लि.चे चेअरमन रवीन मिरचंदानी यांनी श्री. ग्रीन यांच्या उपस्थितीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “आज हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना उच्चायुक्त ग्रीन आमच्या सोबत आहेत यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. गेल्या अनेक वर्षांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील भागीदारी अधिक भक्कम झाली आहे, जिच्यातून पारंपरिक आणि उदयोन्मुख अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सहयोगाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. ही भागीदारी नव्या संधी पुरवित राहणार आहे व स्थानिक पातळीवरील स्थैर्य आणि जागतिक स्तरावरील सहयोगामध्ये योगदान देणार आहे.”
भारताच्या हरित ऊर्जा प्राप्त करण्याच्या आकांक्षांच्या पूर्ततेतील याँडर हबच्या महत्त्वावर भर देत मिरचंदानी पुढे म्हणाले, “याँडर हब ही भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. हा प्रकल्प २०३० सालापर्यंत ५०० गिगावॅट जीवाष्मेतर इंधनावर आधारित ऊर्जेचे लक्ष्य साध्य करण्याचा राष्ट्रीय उद्दीष्टाशी मेळ साधणारा आहे. सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि अद्ययावत तंत्रज्ञानांच्या माध्यमातून भारताचा हवामान कृती आराखडा ‘पंचामृत’ला आधार देणे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.”
अडोर हे ऊर्जा संक्रमण क्षेत्रातील तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित झाले आहे व गेल्या दशकभराच्या कालावधीमध्ये त्याने लिथियमसारख्या उद्याच्या रसायनांसह बॅटरीची रचना व उत्पादन करण्यासाठीचे तंत्रज्ञान तसेच G7 देशांमध्ये निर्यात करण्यासाठी भारतात डिझाइन करण्यात आलेल्या व बनविण्यात आलेल्या DC फास्ट चार्जर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. अडोर पॉवरट्रॉनचे नवीन हायड्रोजन ऊर्जा केंद्र ऊर्जा संक्रमण क्षेत्रासाठीच्या ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपनीचा पाया अधिक खोल करणार आहे व जागतिक स्तरावर हरित हायड्रोजन अधिक सहजप्राप्य व वापरासाठी व्यवहार्य बनविण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावण्याच्या दृष्टीने या केंद्राची रचना करण्यात आली आहे.
आपल्या प्रगत क्षमतांच्या साथीने याँडर हबने अडोर समूहाला भारताच्या ऊर्जा संक्रमणामध्ये आघाडीच्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. युरोपमधील वाढती मागणी पूर्ण करणे हे या केंद्राच्या उत्पादनाचे तातडीचे उद्दीष्ट असले तरीही हे केंद्र भारताची पुनर्नवीकरणीय ऊर्जेची उद्दीष्ट्ये साध्य करण्याच्या कामी व जगाच्या शाश्वत ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेल्या संक्रमणामध्ये देशाला नेतृत्वस्थानी प्रस्थापित करण्याच्या कामीसुद्धा आपले योगदान देत आहे. याँडर हबचा अधिक विस्तार करण्यासाठी अडोरने तीन वर्षांच्या कालावधीत रु. ५० कोटींहून अधिकची गुंतवणूक निश्चित केली आहे.
