Monday, September 21, 2026
Latest NewsPUNE

नांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणी

 

पुणे  : गणेश उत्सवानिमित्त नांदेड सिटी रेसिडेन्शिअल डॉक्टर्स असोसिएशन आणि रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी येथील अँफीथिएटर (गणेश मंडप) येथे भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा नांदेड सिटी, पुणे आणि परिसरातील ४०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेवक सुभाष नाण्हेकर, नांदेड सिटी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष व नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते आणि रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिरीष पाटील यांच्या उपस्थितीत झाले. 

शिबिरात विविध वैद्यकीय शाखांमधील ४० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. सामान्य आरोग्य तपासणीसह अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, स्त्रीरोग, आयुर्वेद, दंतचिकित्सा, होमिओपॅथी, कान-नाक-घसा, बालरोग, फिजिओथेरपी आणि आहारविषयक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय रक्तदाब, रक्तातील साखर, हाडांची घनता तसेच विविध रक्त तपासण्याही करण्यात आल्या.

या वेळी डॉ. ऋषिकेश दामले, डॉ. हरीश गोरे, डॉ. वैशाली गोमसाळे, डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. अनंत शिरुरे, डॉ. रामचंद्र पाडळकर, डॉ. सुशील टिकर, डॉ. व्यंकट जांभळे, डॉ. वैशाली गोसावी, डॉ. शशांक खेडकर, डॉ. गौरी पंडितराव यांच्यासह विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच रामचंद्र मिशनच्या विजयाताई लोणकर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली गोमसाळे आणि डॉ. वैशाली गोसावी यांनी केले, तर डॉ. ऋषिकेश दामले यांनी आभार मानले. विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि तपासणीच्या दृष्टीने उपयुक्त ठरला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अनिल दुधभाते यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘नेत्रकोष’ या डोळ्यांच्या आजारांवरील उपयुक्त पुस्तकाची प्रत आणि रोप भेट देऊन मान्यवरांचा सन्मान केला.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भीमराव तापकीर यांनी निःशुल्क सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. समाजाच्या आरोग्यासाठी डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे त्यांना ‘देव’ का मानले जाते, याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading