Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

आजकाल डिप्रेशन, एन्झायटी असल्याचे सांगणे फॅशन होणे गंभीर – मधुराणी प्रभुलकर

पुणे : पी एम शाह फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवामध्ये लघुपट विभागात डॉ. समीर दातार दिग्दर्शित नेत्रदान या विषयावरील ‘दृष्टीकोन’ या लघुपटाने तर माहितीपट विभागात केरळचे अली अरिकथ दिग्दर्शित ‘जीविथम’ या स्पायनळ इन्जुरी व सेफ्टी विशायावरील माहितीपटाने प्रथम पारितोषिकावर आपली मोहोर उमटवली. दोन दिवस आयोजित या आरोग्य चित्रपट महोत्सवामध्ये मानसिक आरोग्य, स्तनांचा कर्करोग, अवयव दान, पर्यावरण आदी विषयांवरील तब्बल ३४ लघुपट व माहितीपट प्रदर्शित करण्यात आले. महोत्सवाचे हे सलग १३ वर्षे असून यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप समारंभ संपन्न झाला. आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजक अॅड. चेतन गांधी, फ्लेअर नेटवर्क सिस्टिम्सचे अध्यक्ष सतीश कोंढाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशभरातून आलेल्या १५० लघुपटांमधून निवेडलेले ३४ लघुपट व माहितीपट महोत्सवात दाखवण्यात आले.

यावर्षीच्या महोत्सवात लघुपट विभागात परीस (दिग्दर्शक – मुकुंद खुपेरकर) यांनी द्वितीय तर अंतर्नाद (दिग्दर्शक – पार्थ अकेरकर) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर माहितीपट विभागात ग्रीह आर पाईबो कोथा (व्हेअर शॅल आय फाइंड होम) या वृषभ मैत्री दिग्दर्शित माहितीपटाने द्वितीय तर राईट टू क्लीन एन्व्हायर्नमेंट या डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित माहितीपटाने तृतीय क्रमांकावर मोहोर उमटवली.

समारोपप्रसंगी बोलताना मधुराणी प्रभुलकर म्हणाल्या, “आज आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय झाला असून आरोग्यावर आधारित चित्रपट, माहितीपट निर्माण होणे मला स्वत:ला महत्त्वाचे वाटते. आपण भारतीय हे गोष्टीवेल्हाळ लोक असल्याने आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. त्यामुळे एखादा संदेश द्यायचा असेल तर तो गोष्टीच्या माध्यमातून दिल्यास चिरकाल मनात राहतो.” मानसिक आरोग्य हा कळीचा मुद्दा बनला आहे असे सांगत त्या पुढे म्हणाल्या, “डिप्रेशन, एन्झायटी हे शब्द माझ्या पिढीला आधी माहितीही नव्हते मात्र आज मला डिप्रेशन, एन्झायटी आहे हे सांगण्याची जणू फॅशन आहे. हे सारचं गंभीर असून यामागील कारणे शोधणे देखील गरजेचे आहे. बदलत जाणारी व्यवस्था, जीवनशैली, जमिनीचा कस, आपण जे अन्न पोटात घालतोय त्याची गुणवत्ता या गोष्टीही यामध्ये महत्त्वाच्या आहेत.” समाज माध्यमे ही मानसिक आरोग्य बिघडण्याचे सर्वांत मोठे कारण आहेत असेही त्यांनी नमूद केले.

लघुपट, माहितीपट बनवत असताना येणाऱ्या असंख्य अडचणी मी स्वत: जवळून पाहिल्या असल्याने या अडचणी पार करीत त्यातही आरोग्य विषयक प्रश्नांवर लघुपट, माहितीपट बनविणाऱ्या प्रत्येकाचे तोंडभरून कौतुक प्रभुलकर यांनी केले. आज यु ट्यूब सहज उपलब्ध असल्याने आजूबाजूचे अनेकजण कलाकार, दिग्दर्शक, कॅमेरामॅन झाले आहेत. यातूनच आपण अनेक सवंग मनोरंजन पाहतो आहोत. याचा होणारा भडीमार भयंकर आहे. हे सारे खूप उथळ आहे असे मला जाणवते. या पार्श्वभूमीवर काही मूठभर लोकांना आरोग्य या विषयाकडे गांभीर्याने पाहत, आरोग्य विषयक जागृती करणारी निर्मिती केली हेच त्यांचे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading