Tuesday, September 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भीमा कोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्यासाठी ‘पीएमआरडीए’ आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन

 

पुणे: भीमा कोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाचा विकास आराखडा मंजूर करून त्या ठिकाणी लवकरात लवकर भव्य स्मारक उभे करावे, या मागणीसाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीच्या वतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

येत्या १ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला ऐतिहासिक भेट दिल्या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून या ठिकाणी तातडीने काम सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केले. तसेच स्मारकाच्या कामासाठी आवश्यक असणारा विकास आराखडा व आरक्षण तातडीने मंजूर करावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी आयुक्तांसमोर मांडली.

दरम्यान, शासनाने गेल्या पाच ते सात वर्षांपासून या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची भरघोस तरतूद केलेली आहे. मात्र, प्रशासकीय उदासिनतेमुळे अद्यापपर्यंत या निधीतील एकही रुपया प्रत्यक्ष कामावर खर्च झालेला नाही, ही अत्यंत खेदजनक आणि प्रशासकीय नामुष्की आहे, अशी तीव्र भावना भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली. आता कोणतीही तांत्रिक सबब न सांगता स्मारकाचे काम गतीने पुढे न्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक कांबळे यांनीही आंबेडकरी जनतेच्या भावना व्यक्त केल्या. भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक हे संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रशासनाने आता अधिक वेळ न घालवता या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

*आयुक्तांचे सकारात्मक आश्वासन व तात्काळ कारवाईचे आदेश:*
सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी या निवेदनाला अनुषंगून तात्काळ कारवाई करण्याबाबतच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागाला दिल्या आहेत. तसेच, हे राष्ट्रीय स्मारक शक्य तितक्या लवकर उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळाने आयुक्तांशी सकारात्मक चर्चा केली असून, प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading