Tuesday, September 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

निवडणूक आयोगाविरोधात ४ ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा; तिरंगा हातात घेऊन सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवतीर्थ येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात संयुक्त मोर्चाची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली.
राज ठाकरे यांनी सांगितले की, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी रिचर्डसन अँड क्रुडास येथून मोर्चाला सुरुवात होईल. सकाळी १० वाजता जमण्याची वेळ असून, ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास मोर्चा महापालिका मुख्यालयाकडे रवाना होईल. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
मोर्चात नेमके कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत, याबाबत ४ ऑक्टोबर रोजी सविस्तर भूमिका मांडू, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर २०१७-१८ मध्ये आपण अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्याबाबतही मोर्चात सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मोर्चासाठी सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार असून, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही सहभागी होता येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. सहभागींच्या हातात केवळ तिरंगा असेल. हा विषय संविधानाच्या संरक्षणाशी संबंधित असल्याने तिरंगा घेऊन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांमध्ये आंदोलनावरून स्पर्धा सुरू असल्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हा स्पर्धेचा विषय नसल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाविरोधातील अजेंडा एकच असून, ज्याला ज्या पद्धतीने आंदोलन करणे शक्य आहे, त्याने ते करावे, असे ते म्हणाले. सोसायट्यांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरी त्याचे स्वागतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading