Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई: मंत्रिपद नाकारल्याने नाराज असलेले छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर या दोघांची सुमारे अर्धा तास खलबते झाली. या दोघांची नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवून मंत्रिमंडळ निश्चित केले. मात्र, तब्बल चाळीस वर्ष राजकारणात असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडामध्ये अजित पवार यांना खंबीर साथ देणारे भुजबळ यांना डावलण्यात आले. त्यामुळे भुजबळ कमालीचे नाराज आहेत. 

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार पुढाकार घेणार असून ते पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे. मात्र, ही भेट होण्यापूर्वीच भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ मंत्री, पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यातच त्यांनी आज थेट फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

आपण दीर्घकाळ मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. मंत्रिपद मिळाले नाही त्याबद्दल राग नाही. मात्र, लोकसभा उमेदवारी, राज्यसभा उमेदवारी यात जी अवहेलना करण्यात आली ती क्लेश देणारी आहे. आपला संघर्ष मंत्रिपदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे, असे भुजबळ यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading