निकषात न बसणाऱ्या तालुक्यांनाही दुष्काळाची मदत; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई : दुष्काळाच्या निकषात पात्र ठरत नसले, तरी प्रत्यक्षात शेतीचे नुकसान झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
दुष्काळग्रस्त भागांचे मूल्यांकन करताना केवळ तांत्रिक निकषांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतजमिनीची पाहणी आणि पिकांची स्थिती लक्षात घेतली जाणार आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत.
ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार दुष्काळग्रस्त भागांना मिळणारे लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी ‘ट्रिगर-२’मधील काही निकष तसेच पिकांची प्रत्यक्ष अवस्था विचारात घेतली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निर्णयामुळे विद्यमान निकषांमुळे मदतीच्या चौकटीबाहेर राहिलेल्या तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
