वाकोडे प्रकरणावरून सचिन खरातांचा अभिजीत दीपकेंवर निशाणा; राज ठाकरेंनाही घेरले
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी दलित विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणावरून अभिजीत दीपके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वाकोडे प्रकरणात दीपके यांनी आंदोलन किंवा मोर्चा का काढला नाही, असा सवाल खरात यांनी उपस्थित केला. एका दलित विद्यार्थ्याच्या प्रकरणापेक्षा त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मुद्दा अधिक महत्त्वाचा का वाटतो, असा प्रश्नही त्यांनी केला.
खरात म्हणाले की, दलित विद्यार्थ्यांना पाणी नाकारण्याच्या घटना तसेच परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाल्याच्या वेळी अभिजीत दीपके कुठे होते, हे त्यांनी स्पष्ट करावे. वाकोडे प्रकरणात त्यांनी भूमिका का घेतली नाही, असा सवाल करत खरात यांनी दीपके यांच्यावर तीव्र शब्दांत आरोप केले.
अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या माध्यमातून ते सत्तेत येणार आहेत का, असा सवालही खरात यांनी उपस्थित केला. वाकोडे यांच्यासाठी दीपके आंदोलन करणार आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. दीपके यांच्यावर टीका करताना खरात यांनी त्यांना ‘केजरीवालचे पिल्लू’ असे संबोधले.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा संदर्भ देत खरात म्हणाले की, त्या आंदोलनाला यश मिळाले ते वांगचुक यांच्या नेतृत्वामुळे. तसेच उपोषणाच्या राजकारणावर भाष्य करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपोषणाला अराजकतेच्या राजकारणाशी जोडले होते, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, वाकोडे प्रकरणात जातीय मुद्दा आणू नये, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर खरात यांनी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील जातीय राजकारण २००० सालापासून शरद पवारांमुळे सुरू झाले, या राज ठाकरे यांच्या भूमिकेला त्यांनी विरोध केला.
जातीय राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाल्याचा आरोप खरात यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला केलेला विरोध तसेच शिवसेना सत्तेत आल्यानंतर मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदी झालेली नियुक्ती ही जातीय राजकारणाची उदाहरणे असल्याचा दावा त्यांनी केला.
वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांनी आंदोलन का केले नाही, असा सवाल करत खरात यांनी या प्रकरणात सर्व संबंधित राजकीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
