परवानगी नाकारली तरी सीजेपीचा ‘जेल भरो’; 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कात आंदोलनाची अभिजीत दीपकेंची घोषणा
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची घोषणा करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला (सीजेपी) मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, पोलिसांच्या या निर्णयानंतरही आंदोलन मागे न घेता 2 ऑक्टोबरला ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी केली आहे.
दीपके यांनी एक्सवर पोस्ट करत आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर केले. “ज्ञानू, जावंच लागेल… येत्या 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता मुंबईच्या शिवाजी पार्कात मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे. या पोस्टसोबत त्यांनी ‘सेव्ह डेमोक्रसी’ हा हॅशटॅगही वापरला आहे.
सीजेपीने मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही मागणी फेटाळली. त्यानंतरही आंदोलन करण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला होता. आता त्यांनी आंदोलनाचे स्वरूप ‘जेल भरो’ असे जाहीर केल्याने पोलिसांसमोरही कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रियेबाबत आणि विशेषतः मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत (SIR) सीजेपीकडून सातत्याने आक्षेप व्यक्त करण्यात येत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सीजेपीने आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महामोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे.
या महामोर्चाचा मार्ग आणि वेळ राज ठाकरे लवकरच जाहीर करणार आहेत. त्यामुळे 2 ऑक्टोबरच्या सीजेपीच्या आंदोलनानंतर 4 ऑक्टोबरला होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या महामोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
