Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

कर्नाटकच्या आमदाराने केली मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी

बेळगाव:  महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी बेळगाव, कारवारचा परिसर केंद्रशासित करण्याची मागणी करत असतील तर आपली देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी आहे, अशी मल्लिनाथी कर्नाटकमधील आमदाराने केली आहे. 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे. यावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर वाद सुरू आहेत. हा वाद मिटवण्यासाठी केंद्रीय पातळीवर अथवा दोन्ही राज्यांच्या पातळीवर सातत्याने प्रयत्न केले जात नसले तरी देखील हा सीमावाद मात्र सातत्याने डोके वर काढत असतो. त्याला हिंसक वळण लागल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत.

कर्नाटक विधिमंडळाचे बेळगाव येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आलेले आंदोलन यामुळे सीमावादाचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला समर्थन देण्यासाठी विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते कार्यकर्ते बेळगावत जाऊन थडकले होते. याच काळात बेळगाव कारवारच्या वादग्रस्त सीमाभागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली. 

याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकातील अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी चक्क मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. आम्हीही एकेकाळी मुंबई प्रांताचा भाग होतो. आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्याला होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर हक्क आहे. बेळगाव, कारवारला केंद्रशासित प्रदेश करायचा असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करावा यासाठी आपण केंद्राकडे शिफारस करू, असे सवदी यांनी बेळगावच्या सुवर्ण विधानसभेत म्हटले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading