शासकीय दाखले मिळविण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद
मुंबई : ईशान्य मुंबई शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप येथील कार्यालयात आज पासून ‘शासकीय दाखले शिबीरा’ला सुरुवात झाली आहे. हे शिबीर २४ डिसेंबर पर्यंत चालणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी केले आहे.
शासकीय दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. इतके करुनही वेळेवर दाखले मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव असतो. त्यामुळे ईशान्य मुंबई शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावतिने शासकीय दाखले शिबीराची सुरवात करण्यात आली आहे. २४ डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यत हे शिबीर चालणार असून जेष्ठ नागरिकांनी सकाळपासूनच दाखले घेण्यासाठी गर्दी केली आहे.
उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला (डोमेसाईल सर्टिफिकेट), स्थानिक वास्तव्याचा दाखला व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र या शिबीरात तयार करुन मिळणार आहे. उत्पन्नाच्या दाखला मिळविण्यासाठी सोबत रेशन कार्ड, आधार कार्ड, आर्थिक प्रमाणपत्र, आयकर विवरण पत्र व लाईट बिल लागणार आहे तर अधिवास दाखल्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, शिक्षणाचा पुरावा, बँक पासबुक व दोन पासपोर्ट साइज फोटो तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, गॅझेट कॉपी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो, जन्म प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला तर स्थानिक वास्तव्याचा दाखला प्राप्त करण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, गॅझेट कॉपी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, शिक्षणाचा पुरावा (मार्कशीट), बँक पासबुक, जन्म प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. ईशान्य मुंबई शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप येथील कार्यालयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
