Tuesday, September 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

अन्यायाविरुद्ध ‘रंगा’ची धडकी भरवणारी लढाई!

गूढ स्वभावाचा नायक,अनपेक्षित संकटाचा सामना करताना होणारा संघर्ष,  थरारक  ऍक्शन सोबत भावनिक गुंत्याची व्यथा … अशा वेगळ्या रंगातला ‘सायको रंगा’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून रंगाच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्याचा लढा पाहायला मिळतो. एका बाजूला गावाकडची माती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुसरीकडे शहरातील सत्तेचे आणि पैशाचे खेळ अशा दोन वेगवेगळ्या विश्वांमधून रंगाची गोष्ट पुढे सरकताना दिसते. अन्याय करणाऱ्यांविरोधात थेट भिडणारा रंगा नेमका कोणत्या परिस्थितीत या संघर्षात उतरतो, त्याच्या लढ्यामागचं कारण काय आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय, याची उत्सुकता ट्रेलरमुळे अधिक वाढली आहे.

देवेंद्र चौगुले यांच्या लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते , आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांच्या भूमिका आहेत. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून उलगडणारा हा संघर्ष आणि त्यांच्यातील नात्यांची गुंतागुंत ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका नेमकी काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक देवेंद्र चौगुले म्हणतात, “‘सायको रंगा’ ही परिस्थितीसमोर उभं राहाण्याची आणि आपल्या अस्तित्वासाठी लढण्याची गोष्ट आहे. रंगाच्या व्यक्तिरेखेत अनेक पदर आहेत आणि त्याचा प्रवास जसजसा पुढे जातो, तसतसे त्याच्या आयुष्यातील काही अनपेक्षित पैलू समोर येतात. ट्रेलरमधून चित्रपटातील रंगा आणि त्यातील संघर्षाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.“

देवेंद्र चौगुले लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटाच्या सहदिग्दर्शनाची जबाबदारी स्नेहलराज (दादू) यांनी सांभाळली आहे. उत्तम चोरडे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. येत्या २५ सप्टेंबरला ‘सायको रंगा’ प्रदर्शित होणार आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading