दिव्यांग सैनिकांकरिता पोलीस आणि हिंदू – मुस्लिम बांधवांतर्फे सद्भावना रॅली
पुणे : देशाच्या सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसाठी पोलिसांसोबत सद्भावना रॅली काढली. भारत माता की जय… वंदे मातरम अशा देशभक्तीच्या घोषणांनी शहराच्या पूर्व भागातील चौक दुमदुमून गेले. यामाध्यमातून राष्ट्रभक्तीचा आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.
खडक पोलीस स्टेशन आणि सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले पेठ, मोमीनपुरा परिसरात सद्भावना रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवृत्त लेफ्टनंट अमरजित सिंग, क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिटयूटचे उपप्राचार्य शशिकांत पाटील, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, गंज पेठ पोलीस चौकीच्या अनिता तोंडे, नगरसेवक अजय खेडेकर, गणेश कल्याणकर, राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, पीएसआय असगर सैय्यद, हवालदार नामदेव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उदय जगताप, कुमार रेणुसे, मुन्नाभाई शेख, अन्सर पिंजारी, दर्शन किराड, विष्णू ठाकूर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ महाडिक, निलेश रसाळ, मंदार रांजेकर, अमर लांडे, सचिन ससाने, नमन कांबळे, कुणाल जाधव, अमय थोपटे,अभिषेक पायगुडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांनी केलेले औक्षण, फुलांची उधळण आणि सैनिकांच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू… असे भावनिक आणि उत्साही वातावरण गणेशोत्सवात पाहायला मिळाले. हिंदू बांधवांसह मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करीत सैनिकांचे स्वागत केले. यावेळी एकूण २१ जवान व त्यांचे कुटुंबीय होते
आनंद सराफ म्हणाले, काही काळापूर्वी समाजात जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम झाले होते. त्यावेळी तो द्वेष कमी करण्यासाठी गणपती मंडळांनी पुढाकार घेऊन सद्भावना रॅलीची सुरुवात केली. त्या वेळी सर्व धर्मीय नागरिक अपंग सैनिकांची व्हीलचेअर पुढे नेण्यासाठी एकत्र आले होते. ज्या वाटेवर धर्माच्या द्वेषाचे काटे पसरले होते, त्या वाटेवर एकतेची फुले उधळली गेली. आजही ती परंपरा सुरू असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले.
शिरीष मोहिते म्हणाले, भारतीय जवान आपल्या प्राण्यांची बाजी लावून देशाच्या सीमेचे रक्षण करतात. त्यावेळी अपंगत्व आले तरी जीवनाला धैर्याने तोंड देतात. त्या कार्याला सलाम करण्यासाठी या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले. विक्रांत मोहिते यांनी स्वागत केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
