Thursday, November 5, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सेलिब्रिटींना धमकावणारा आयटी इंजिनिअर अटकेत

वैभव मिश्रा याला बेंगळुरूमधून अटक
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार आणि बड्या व्यावसायिकांना धमकावून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचे ऑडिओ संदेश पाठवणाऱ्या वैभव मिश्रा याला पोलिसांनी बेंगळुरूमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी आयटी इंजिनिअर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव वापरून सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमकीचे संदेश पाठवत होता. या संदेशांमुळे मनोरंजन क्षेत्रासह व्यावसायिक वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या धमक्यांमागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला बेंगळुरूमध्ये गाठले आणि अटक केली.
आरोपीने आतापर्यंत किती जणांना धमकावले, लॉरेन्स बिश्नोईचे नाव वापरण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता आणि या प्रकारात अन्य कोणी सहभागी आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. आरोपीच्या चौकशीतून या धमकी प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणीही पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एकाचे वय १८ वर्षे, तर अन्य दोघांचे वय २२ वर्षे आहे. हे आरोपी काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य करून त्याच्या वाहनावर हल्ला केला होता.
हल्ल्यानंतर आरोपींनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडून पळ काढला. मात्र, मुंबई पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच तिघांनाही अटक केली. सेलिब्रिटींना धमकी देण्याचे प्रकार आणि अभिनेत्यांना लक्ष्य करून होणाऱ्या हल्ल्यांमुळे बॉलिवूडमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply