मेट्रो प्रवाशांसाठी पीएमपीएमएलची मोठी सुविधा; ११ नवीन फिडर बसमार्ग सुरू
मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे होणार सोपे; २२ नवीन बसथांबे, दररोज ६२० बसफेऱ्यांचे नियोजन
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) ११ नवीन मेट्रो फिडर बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच, यापूर्वी सुरू असलेल्या एका बसमार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेंतर्गत नव्याने २२ बसथांबे उपलब्ध करून देण्यात येणार असून, ४ नोव्हेंबरपासून या बससेवांना सुरुवात झाली आहे.
महामेट्रोकडून ३ नोव्हेंबर रोजी माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक ३ सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता यावे, तसेच मेट्रो आणि पीएमपीएमएल या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवांचा एकत्रित लाभ घेता यावा, यासाठी पीएमपीएमएलने ही नवीन फिडर बससेवा सुरू केली आहे.
नवीन बसमार्गांमध्ये पिंपरी मेट्रो स्टेशन ते वाकड चौक, माण एमआयडीसी सर्कल फेज २ ते निलसॉफ्ट कंपनी इन्फोसिस फेज ३, म्हाळुंगे गाव ते टीसीएस माण मेट्रो स्टेशन, टीसीएस माण मेट्रो स्टेशन ते पोतदार इंटरनॅशनल स्कूल, इंदिरा विद्यापीठ ताथवडे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोयतेवस्ती पुनावळे ते पद्मभूषण चौक, लवळे फाटा ते टीसीएस माण मेट्रो स्टेशन, टीसीएस माण मेट्रो स्टेशन ते ब्ल्यू रिज सोसायटी, मिटकॉन मेट्रो स्टेशन बालेवाडी ते गिरमे पार्क आणि विप्रो सर्कल ते एम्बसी टेकझोन पार्किंग या मार्गांचा समावेश आहे.
याशिवाय, मिटकॉन मेट्रो स्टेशन बालेवाडी ते चांदेगाव या मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच, माण येथील जॉयव्हिला सोसायटी ते टीसीएस माण मेट्रो स्टेशन असा नवीन मार्गही सुरू करण्यात आला आहे.
या सर्व १२ बसमार्गांसाठी एकूण २५ नियोजित शेड्युल आणि ६२० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी टीसीएस माण, माण एमआयडीसी, माण बस डेपो, हिंजवडी फेज १ व २, विप्रो सर्कल, पद्मभूषण चौक, वाकड चौक, बालेवाडी, बाणेर, औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय बँक, अॅग्रीकल्चर कॉलेज आणि शिवाजीनगर यांसह २२ ठिकाणी नवीन बसथांबे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मेट्रो आणि बससेवेतील समन्वयामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
या नवीन मेट्रो फिडर बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
