अजित पवारांच्या मृत्यूपासून दुष्काळ आणि कर्जमाफीपर्यंत; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी कर्जमाफी आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत आपण लवकरच सविस्तर प्रेझेंटेशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करूनही तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) का सोपवण्यात आलेला नाही, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना रोहित पवार यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. कर्नाटक सरकारने दुष्काळी परिस्थितीबाबत निर्णय घेतला असताना महाराष्ट्रातील शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ भावनिक बॅनर लावून किंवा घोषणा करून उपयोग नाही; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.
“अजित पवार सरकारमध्ये असते तर दुष्काळ जाहीर करण्यास एवढा विलंब झाला नसता,” असा दावा रोहित पवार यांनी केला. अजित पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते, असेही त्यांनी नमूद केले.
सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना त्यांनी, “कोणी दिल्लीला तर कोणी लंडनला जात आहे; मात्र शेतकऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये दादा नावाचा माणूस होता,” अशी टीका केली.
शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कर्जमाफीचा लाभ केवळ सुमारे २० टक्के शेतकऱ्यांना मिळाला असून तब्बल ८० टक्के शेतकरी अद्याप या लाभापासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने राष्ट्रवादीकडून अर्थखाते काढून घेतल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवरही टीका केली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
