Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पद्मश्री सुरेश वाडकर यांना यंदाचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार जाहीर

पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन (पंचमदा) यांचे चाहते असलेल्या पुण्यातील कलावंतांच्या एका समूहातार्फे दरवर्षी बर्मन यांच्याशी संबंधित कलाकारांचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार पद्मश्री सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात येत असलेल्या ‘री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सदर कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ६:०० वाजता संपन्न होईल.

मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ असे ‘पंचमरत्न’ या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार कर्सी लॉर्ड, मनोहरी सिंघ (मनोहरीदा), शैलेंद्र सिंग, तौफिक कुरेशी, नितीन शंकर अशा पंचमदां सोबत काम केलेल्या अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.

दिनांक ४ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमाची संकल्पना पुण्यातील सुरज दोशी, आनंद घोगरे आणि गौरव प्रभुणे या कलाकारांची असून कार्यक्रमात व्हायोलिन सेक्शन, ब्रास सेक्शन, गिटार सेक्शन अशी विविध वाद्ये वाजवणाऱ्या सुमारे ६० हून अधिक कलाकारांचा संच रंगमंचावर असेल. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांचा विशेष सहभाग असणार असून जितेंद्र भूरूक, रुपाली आनंद, विवेक पांडे, विजय जोशी हे सहगायक असतील. कार्यक्रमाचे निवेदन संकर्षण कऱ्हाडे आणि योगिनी पोफळे करतील.

पंचमदांनी संगीतबद्ध केलेली विविध गाणी व किस्से आदींचा आनंद रसिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading