संशोधनाचा विश्वातील प्रत्येक मानवाला फायदा झाला पाहिजे यासाठी संशोधकाने नेहमी प्रयत्नशील राहायला हवे – प्रा. डॉ. आशिष लेले
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात अविष्कार -202४-२५’चे उद्धाटन संपन्न
पुणे : आपल्या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा, तसेच त्याचा विश्वातील प्रत्येक मानवाला फायदा झाला पाहिजे यासाठी संशोधकाने नेहमी प्रयत्नशील राहायला हवे, असे मत एनसीएल(राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) चे संचालक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आशिष लेले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘अविष्कार -202४-२५’ या १७ व्या विद्यापीठस्तरीय संशोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक प्रा. (डॉ.) संजय ढोले, अविष्कार -202४-२५ समितीचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) देविदास वायदंडे, डॉ. के.सी. मोहिते, डॉ. प्रगती ठाकूर आदी उपस्थित होते.
सोशल सायन्स हे विज्ञान व तंत्रज्ञानाकरिता खूप महत्वाचे ठरले आहे. यामधील विविध संशोधनामुळे समाजाच्या अनेक समस्या सुटल्या आहेत. अविष्कार स्पर्धेचे कौतुक करतांना यामध्ये ज्ञानाचे विविध प्रवाह एकत्र आलेले पाहावयास मिळत असल्याचेही डॉ. लेले यांनी यावेळी सांगितले. तसेच संशोधक म्हणून तुमच्यात ते संशोधन समाजासमोर मांडण्याचे कौशल्यही विकसित करता आले पाहिजे, असेही ते यावेळी उपस्थित युवा संशोधकांचे संबोधन करताना म्हणाले.
प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेत अविष्कार – २०२४-२५’चे उद्धाटन संपन्न झाले. याप्रसंगी पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामधील विद्यार्थी त्यांच्या प्रकल्पासह सहभागी झाले होते. सदर स्पर्धेमध्ये ३०० प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. सदर प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याकरिता २७ विषयतज्ज्ञ यांनी आपले योगदान दिले. तसेच अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे विभाग प्रमुख, संचालक, प्रा. (डॉ) संजय ढोले, अविष्कार समिती सभासद प्रा. (डॉ . ) प्रगती ठाकूर यांनी मेहनत घेतली.
