गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : विख्यात उद्योगपती गौतम अदानी यांनी आज दुपारी सागर या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीत तब्बल अडीच तास चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते आणि गौतम अदानी यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. अनेकदा विरोधकांकडून त्याबाबत मोदी आणि अदानी यांना टीकेचे लक्ष्य करण्यात येते. अदानी यांचे देशभरातील विविध ठिकाणांप्रमाणेच मुंबईत अनेक प्रकल्प सुरू आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प, मेट्रोचा विस्तार अशा अनेक प्रकल्पांची कामे अदानी यांच्या कंपनीकडे आहेत. त्या अनुषंगानेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अदानी यांच्यावर ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेमध्ये फसवणूक आणि लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अदानी उद्योग समूहातील अदानी ग्रीन एनर्जी आणि आणखी एका कंपनीला सौर ऊर्जा उत्पादनाचे कंत्राट मिळवण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र, अदानी उद्योग समूहाने हे सर्व आरोप नाकारले आहेत.
